मळवंडी ढोरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेची तडकाफडकी बदली

मनमानी कारभाराबाबतची ग्रामस्थांची तक्रारीचा पाढा

वडगाव मावळ – मळवंडी ढोरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली. या तक्रारीची दखल घेत बीडीओंनी ग्रामसेविकेची बदली केली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयातून रहिवाशी दाखले, जन्म-मृत्यूची नोंद, मृत्यू दाखला, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार मिळविण्यासाठी लागणारे जॉब कार्ड, मालमत्ता पत्रक, घर नोंदणी आदी अनेक कामांसाठी ग्रामस्थांना ग्रामसेविकेला शोधत फिरावे लागते. तसेच फोन केल्यावर मी आज वडगावच्या तालुक्‍याच्या कार्यालयात आहे. वडगावात ग्रामस्थ गेल्यावर मी आता घरी आहे, अशी उत्तरे देऊन नागरिकांना हेलपाटे मारावे लावत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मळवंडी ढोरे ग्रामपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा मागील आठ दिवसांपासून बंद असून, तरीदेखील ग्रामसेविका गावात फिरकत नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंध झाल्याने गावातील लोकांना नदीवरून डोक्‍यावर पाणी आणावे लागत आहे. तसेच गावातील काळवाडी वस्ती वरील “स्ट्रीट लाईट’ मागील पंधरा दिवसांपासून बंद आहे, त्याची सूचना देऊन देखील ग्रामसेविका काहीच काम करत नसल्याने गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेविकेची त्वरित बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या विकास कामांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थांसह पदाधिकारीही कंटाळले आहेत.

विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब
मागील अनेक वर्षांपासून मळवंडी ढोरे ग्रामपंचायतीला एकाच ग्रामसेविका काम करत असून, अद्यापही त्यांची बदली करण्यात आलेली नाही. चौदाव्या वित्त आयोगातून गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीस दरवर्षी निधी मिळत असतो. पण या निधीतील 2016-17 व 2017-18 या वर्षात विकास कामांसाठी आलेला निधी अजून खात्यावर तसाच पडून आहे. विविध विकास कामे देखील झालेली नाहीत. ग्रामपंचायतीकडून ठेकेदारांची मनधरणी केली जात आहे. ज्या ठेकेदारास कामे दिली आहे, तो ठेकेदार मी कामे करणार नाही असे स्पष्ट सांगून देखील त्यांची मनधरणी केली जात आहे. त्यांच्या कामाचा कालावधी वाढविला जात असल्याने विकास कामे रेंगाळली आहेत.

मळवंडी-ढोरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेची त्वरित बदली करून तिच्या मनमानी कारभाराची चौकशी करणार आहे. त्या जागेवर सक्षमपणे कार्यभार सांभाळणाऱ्या ग्रामसेवकाची त्वरित नियुक्ती करण्यात येईल.
– निलेश काळे, गटविकास अधिकारी, मावळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)