मल्हारलिंग यात्रेतील पाल-पेंबरचे राजापूर…

जेजुरी- पाल-पेंबर (जि. सातारा) 12 मल्हारलिंग यात्रेतील हे दुसरे ठिकाण असून पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर अतीत व काशीळ गावच्या फाट्यापासून दक्षिणदिशेला 6 कि.मी.अंतरावर तारळी जमिनीलगत नदीकिनारी मंदिर आहे. मंदिराच्या ठिकाणाला राजापूर असेही नाव प्रचलित आहे.
या मंदिराला तटबंदी असून तीन मोठी द्वारे आहेत. मंदिर आवारात दीपमाळा व इतर देवकुळे (इतर उपमंदिरे) आहेत. जेजुरी सारखेच येथेही चंपाषष्ठी, विजयादशमी, उत्सव साजरे केले जातात. पौष महिन्यात देवांचा लग्नविधी सोहळा साजरा होतो. यावेळी भाविकांची लक्षणीय गर्दी असते. येथे पूजा धार्मिक विधींसाठी वंश परंपरागत गुरव पुजारी आहेत. मंदिर व्यवस्थापनासाठी ट्रस्ट आहे. पुरातन काळातील मंदिर असल्याने अठरापगड जातीधर्मातील समाजबांधवांना येथे मानपान असल्याने इनाम वतने, तनखा दिल्याचे उल्लेख काही जुन्या दस्तऐवजांमध्ये मिळून येतात तसेच देवांचे वर्षातील सण, उत्सव, धार्मिक विधी, साजरे करण्यासाठी अनेक मराठेकालीन-पेशवेकालीन घराण्यांनी सालाना तनख्याची व्यवस्था केल्याचे उल्लेख आहेत.
12 मल्हारलिंग यात्रेतील ही दोन तिर्थक्षेत्रं महाराष्ट्रात येतात तर त्यानंतरची मल्लया- मंगसूळी (ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक) हे सांगली-मिरज पासून उत्तर पूर्व बाजूला 70 कि.मी. अंतरावर खंडोबाचे मंदिर आहे. कानडी भाषिकांचा हा कुलदेव असल्याने या दैवताला मल्लया, असे संबोधले जाते. येथील पुजारी वंशपरंपरेनुसार गुरव आहेत तर मंदिर व्यवस्थापनासाठी स्वतंत्र ट्रस्ट आहे. मंदिराला वाड्यासारखी तटबंदी असून मुख्य मंदिराचे बांधकाम किमान 1500 वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी दिसून येते. मात्र, नंतरच्या काळात मुस्लिम राजवट असल्याने दर्ग्यासारखे येथे काही बांधकाम दिसते. तळीभंडार, जागरण गोंधळ हे विधी येथे होत नाहीत तर त्रिकाल पूजा होत. लंगर तोडणे या विधीला येथे महत्व आहे. विजयादशमी, चंपाषष्ठी उत्सव येथे साजरे केले जातात. चैत्र महिन्यात दशमीला मोठी यात्रा भरते, यावेळी वाघ्या भक्तांकडून लंगर तोडण्याचा विधी होतो. देवदर्शनाचा वार रविवार समजला जातो. देवदर्शन घेताना भाविक येळकोट…, येळकोट…, असा जयघोष करतात. भंडारा देवाचे चरणी अर्पण करीत कपाळी लावतात.

  • तिर्थस्थळ बाळेकुंद्री…
    तिर्थस्थळ बाळेकुंद्री (ता.जि. बेळगाव) मंगसूळीपासून पुढील खंडोबा यात्रा करताना चिककोंडी मार्गे बेळगावपासून विमानतळ रस्त्याला 12कि.मी. अंतरावर बाळेकुंद्री या ठिकाणी दत्तमंदिर व सद्गुरू पंतमहाराज (कार्यकाळ 1855ते1905) यांचे समाधीस्थळ (मठ)आहे. मठाचा परिसर निसर्गरम्य व विस्तृत असून या ठिकाणी सर्वसोईसुविधा असलेले भव्य भक्तनिवास आहे. या ठिकाणी राहण्याची उत्तम व्यवस्था व अल्पोपहार महाप्रसादाची व्यवस्था आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)