मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचे दिल्ली कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली – वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्लीतल्या न्यायालयाने दिले आहेत. “फेरा’ कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणामध्ये विजय मल्ल्या याने समन्स टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला फरार आरोपी घोषित करण्यात आले आहे. त्याच संदर्भात महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत यांनी दिल्ली आणि बेंगळूरुच्या पोलिस आयुक्‍तांना हे आदेश दिले आहेत आणि या संदर्भातील अहवाल 8 मे पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याची मागणी सक्‍तवसुली संचलनालयाने केली होती.

“फेरा’ कायद्याच्या उल्लंघनाबाबत वारंवार समन्स बजावून देखील मल्ल्या उपस्थित राहिलेला नव्हता. त्यामुळे मल्ल्याला 4 जानेवारी रोजी फरार आरोपी घोषित करण्यात आले होते. गेल्या वर्षी 12 एप्रिल रोजी मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले आहे. हे वॉरंट नेहमीच्या अजामीनपात्र वॉरंटप्रमाणे नाही, तर “ओपन एंडेड’ वॉरंट आहे. यानुसार अटक करण्यासाठी कोणत्याही मुदतीचे बंधन नाही. मल्ल्याला भारतात परतण्याचा कोणताही हेतू आणि कायद्याबाबत कोणताही आदर दिसत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2016 रोजी नोंदवले होते. मल्ल्याविरोधात अनेक प्रकरणांमध्ये खटले सुरू असल्याने त्याच्याविरोधात सक्‍तीने कारवाई करणे आवश्‍यक असल्याचेही न्यायालय म्हणाले होते.

मार्च 2016 मध्ये देशाबाहेर पळून गेलेला मल्ल्या सध्या लंडनमध्ये असून पासपोर्ट रद्द झाल्याने आपण प्रवास करू शकत नसल्याचे त्याने 9 सप्टेंबर रोजी म्हटले होते. त्याच्या मालकीच्य किंगफिशर एअरलाईन्सवरील 9 हजार कोटी रुपयांचे आणि अन्य काही आर्थिक कर्ज बुडवल्याचा आरोप मल्ल्यावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)