मलकापूर नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला

दि. 27 जानेवारीला मतदान, 28 रोजी निकाल
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) – मलकापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून दि. 2 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. दि. 27 जानेवारीला मतदान आणि दि. 28 रोजी मतमोजणी होणार आहे.
मलकापूर नगरपंचायतीला 24 सप्टेंबर 2018 रोजी ङ्गकफ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. त्यानंतर मलकापूरातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या. दि. 4 डिसेंबर रोजी मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत होवून त्यामध्ये नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले. मलकापूर नगरपरिषदेसाठी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवड होणार असल्याने कराड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मलकापूरला 19 जागांसाठी निवडणूक होत असून प्रारूप यादीनुसार मलकापूर शहरात सुमारे 18 हजारावर मतदार आहेत. गुरूवारी राज्य निवडणूक आयोगाने नवनिर्वाचित नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होत असून दुसर्‍या दिवशी 28 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीसाठी येत्या 2 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होेणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी जाहीर केले आहे. निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाला असून मलकापूरात राजकीय घडामोडीला आता खर्‍या अर्थाने वेग येणार आहे.
मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी दि. 2 जानेवारी ते 9 जानेवारी 2019 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. रविवार, दि. 6 जानेवारी रोजी सुट्टीच्या दिवशी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवारी अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. उमेदवारी अर्जांची छाननी दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. रविवार, दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान आणि दि. 28 जानेवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)