मलकापूरातील अडीच लाखाच्या चोरीचा गुन्हा उघड

आंतरराज्य टोळीतील संशयितांची कबुली
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) – मलकापूर (ता. कराड) येथून कारची काच फोडून गाडीतील अडीच लाखाच्या रोकड चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. सांगोला पोलिसांनी जेरबंद केलेल्या आंतरराज्य टोळीतील दोन संशयितांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सांगोला पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा कराड शहर पोलिसांकडे दोन्ही संशयीतांना वर्ग केले आहे. दरम्यान, दोन्ही संशयितांना गुरूवारी कराड न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. अनिल दायकर मेकला (वय 34) व गोंडट्री रसय्या बाबू (वय 54, दोघेही रा. तिप्पाबिटरगुंटा ता. कागल जि. नेल्लोर-आंध्रप्रदेश), अशी संशयीतांची नावे आहेत.
मलकापूर येथील नटराज टॉकीजसमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून दि. 3 नोव्हेंबर रोजी भरदिवसा चार जणांच्या टोळीने कारमधील सुमारे अडीच लाख रूपयांची रोख रक्कम लांबवली होती. दरम्यान, सांगोला पोलिसांनी सांगोला शहरातील दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना आंतरराज्य टोळीचा छडा लावून दोघांना जेरबंद केले होते. या टोळीतील अन्य संशयितांचा अजून शोध सुरू आहे. सांगोला पोलिसांच्या चौकशीत या दोघांनी मलकापूर येथील कारमधून अडीच लाख रूपये चोरल्याची कबुली दिली. या टोळीने आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात व महाराष्ट्र अशा चार राज्यांमध्ये चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन झाले आहे. मलकापूर येथील चोरी प्रकरणी सांगोला पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा दोन्ही संशयीतांना कराड पोलिसांकडे वर्ग केले आहे. गुरूवारी त्यांना कराड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)