
आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे गौरवोद्गार
कराड, दि. 2 (प्रतिनिधी) – स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार स्वर्गीय भास्करराव शिंदे दादांचे कार्य नव्या पिढीला माहिती होणे गरजेचे आहे. त्यांनी जगाच्या पाठशाळेतील शिक्षण घेतले. मलकापूर शहराच्या विकासामध्ये दादांचे मोलाचे योगदान आहे. याठिकाणी राबविण्यात आलेल्या चोवीस बाय सात नळ पाणीपुरवठा योजना, प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना आजही यशस्वीपणे सुरु आहेत. या योजना म्हणजेच स्व. दादांचे जिवंत स्मारक असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.
मलकापूर, ता. कराड येथे स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार स्वर्गीय भास्करराव शिंदे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. आ. मोहनराव कदम अध्यक्षस्थानी होते. यावेळी कराड जनता बॅंकेचे अध्यक्ष राजेश पाटील, कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अजित पाटील-चिखलीकर, हिंदूराव पाटील, जि. प. सदस्य मंगला गलांडे, पं. स. सदस्य वैशाली वाघमारे, इंद्रजीत चव्हाण, उत्तमराव पाटील, शिवाजीराव पवार, श्रीरंग जगदाळे, बाळासाहेब कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सुनिता पोळ, सुनंदा साठे, कल्पना रैनाक आदी प्रमुख उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज मलकापूर विकासाच्या वाटेवर प्रचंड वेगाने वाटचाल करत आहे. चोवीस बाय सात नळ पाणीपुरवठा योजना आज जगाच्या नकाशावर पोहोचली आहे. स्वर्गीय भास्करराव शिंदे यांनी मलकापूरसाठी घालून दिलेल्या विकासाच्या दिशेने मनोहर शिंदे यांची वाटचाल सुरु आहे. मलकापूरमध्ये राबवलेल्या योजनांची माहिती संपूर्ण देशाला होण्यासाठी देशभरातील तज्ञांना बोलून प्रत्येक योजनेचा स्वतंत्र अहवाल त्यांच्यासमोर मांडा, अशा सूचनाही आ. चव्हाण यांनी मनोहर शिंदे यांना दिली.
मनोहर शिंदे म्हणाले, दादांच्या विचारावर वाटचाल करत असताना शहरात राबवलेल्या विविध योजना आजही यशस्वीपणे सुरु आहेत. नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करताना अनेकांनी आडकाठी घातली. मात्र, बाबांच्या पाठबळामुळे आज मलकापूर नगरपरिषद अस्तित्वात आली. यावरुन बाबांच्या ताकदीची कल्पना येते. नगरपरिषद झाल्यामुळे शहराच्या विकासाचा वेग वाढणार आहे. दादांच्या स्वप्नातील मलकापूर निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. दादांच्या नंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज बाबांनी मलकापूरचे पालकत्व स्वीकारले आहे. असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अजित पाटील-चिखलीकर, हिंदूराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कोमल कुंदप यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक व महिला उपस्थित होत्या.
बोगस अर्ज करणाऱ्या राजकिय टोळ्या
मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर लोकशाहीने लोकांना दिलेल्या मतदानाच्या अधिकारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकिय टोळ्यांना ऊत आलेला आहे. ऑनलाईन बोगस अर्ज करुन मतदार यादीतील नावे कमी करण्याचा काहींनी उद्योग केला आहे. या टोळीचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी निवडणूक आयोग व पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या टोळ्या पैशाने गब्बर असल्यानेच असे उद्योग सुरु झाले आहेत. मात्र लोकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न कदापी सुध्दा यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा