मलकापूरचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

कराड – नव्याने स्थापन झालेल्या कराड लगतच्या मलकापूर क वर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी (ओबीसी) राखीव पडले आहे. मंत्रालयात आरक्षण सोडतेवेळी राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते चिठ्ठी टाकून हे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता जनतेतून ओबीसी महिला नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांची निराशा झाली आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीनंतर मलकापूरच्या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे.
मलकापूर नगरपंचायतीचे न्यायालयाच्या आदेशानंतर नगरपरिषदेत रूपांतर झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू केली. शहरात 9 प्रभाग पाडले असून त्याचे आरक्षण जाहीर केले. त्यातून 19 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे. यासाठी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या आरक्षणात सोडतीवेळी ओबीसी महिलेसाठी मलकापूरचे नगराध्यक्षपद राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले.

-Ads-

महाराष्ट्रातील मलकापूर व सिंदखेडराजा या दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाची सोडत आज मंत्रालयात झाली. त्यानुसार राज्यातील ओबीसी महिलेसाठी एक बॅकलॉग शिल्लक असल्याने चिठ्ठी टाकून ओबीसी महिलेबाबत आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.

त्यापैकी राज्यमंत्री रणजित पाटील यांनी एक चिठ्ठी उचलून मलकापूरसाठी ओबीसी महिला आरक्षण पडल्याचे जाहीर केले. तर सिंदखेडराजा नगरपालिकेसाठी ओपन नगराध्यक्षपद पडले. यावेळी प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी संजिवनी दळवी, ज्ञानदेव साळुंखे हे उपस्थित होते. कॉंग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, नारायण रैनाक, धनराज मनोहर शिंदे यांची उपस्थिती होती. तर भाजपातर्फे माजी नगरसेवक हणमंतराव जाधव, हर्षद मोहिते यांनीही हजेरी लावली होती.

नगरपरिषद जाहीर झाल्यापासून मलकापूरात नगराध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू होती. हिवाळी अधिवेशनानंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले जाईल असे सांगितले होते. त्यानुसार चार दिवसांपूर्वी मंगळवारी मंत्रालयात नगराध्यक्षपदाचे आरक्षण  जाहीर करणार असल्याचे पत्रक शासनातर्फे काढण्यात आले. आज मंत्रालयात राज्यातील दोन नगरपालिकांच्या आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार ओबीसी महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांची निराशा झाली.

ओबीसी महिला आरक्षणामुळे मातब्बरांच्या दांड्या गुल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. असे असलेतरी मलकापूर क वर्ग नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक संघर्षाची होणार असून त्यासाठी राजकीय नेत्यांनी आपली ताकद लावली आहे. मतदार यादीतील नावांबाबत बोगस ऑनलाईन अर्जांवरून निवडणूकी पूर्वीच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सक्षम उमेदवार देण्यासाठी मुलाखती व बैठकांचे सत्र सुरू झाल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)