मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र

    प्रासंगिक

  प्रा. डॉ. विजयकुमार

प्रभू रामचंद्रांना भारतीय परंपरेतील विष्णूच्या दहा अवतारांपैकी सातवा अवतार मानण्यात येते. प्रत्येक प्राणिमात्रात ज्याचा वास म्हणजे निवास असतो, जो रमण करतो त्याला राम असे म्हटले जाते. इंदिरा गांधीच्या काळात बी. बी. लाल यांनी रामायण पुरातत्व हा प्रकल्प राबवला आणि रामायण प्रत्यक्षात घडून आले असल्याचे सिद्ध केले. रामसेतूच्या अस्तित्वालाही नासाच्या संशोधनामुळे पुष्टी मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संस्कृतीमध्ये ज्या व्यक्‍तिमत्वाचा करिष्मा सदैव कायम राहिला आहे त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा समावेश अग्रक्रमाने होतो. प्रभू रामचंद्रांना भारतीय परंपरेतील विष्णूच्या दहा अवतारांपैकी सातवा अवतार मानण्यात येते. वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांना वनवासींनी खूप सहाय्य केले होते. भारतात सुदूर पसरलेल्या डोंगराळ भागात वनवासींच्या आदर्श आणि अद्‌भुत शक्‍तीने भारतीय मूल्यांची प्रस्थापना करून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना लोकहृदयात अधिष्ठित केले. वाल्मिकींनी रामायण लिहून प्रभू रामचंद्राला साहित्याच्या दालनात अमर केले. तर तुलसीदासाने रामचरित मानस हा ग्रंथ लिहून संपूर्ण हिंदी भाषक उत्तर भारतात प्रभू रामचंद्रांना मध्ययुगातही अजरामर करून ठेवले. मराठीमध्ये ग. दि. माडगूळकरांनी रचलेल्या भावार्थ रामायणाने तीन पिढ्यांवर गारुड केले. तसेच आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यातही रामायणाचा लोकजीवनात समावेश दिसून येतो.

डॉ. पी. व्ही. वर्तक यांनी इतिहासाचे वास्तव लिहून रामचंद्रांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत अनेक घटनांचे सत्य पुराव्यांच्या आधारे नव्याने उकल करण्याचा प्रयत्न केला. डी. सी. ऊर्फ दिनेशचंद्र सरकार यांचे असे मत होते की, रामायण प्रत्यक्षात घडले आहे. पण महाभारत मात्र मिथक आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणातून रामायण आणि महाभारत प्रत्यक्षात घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉ. वर्तक यांनी इतिहासाचे वास्तव या ग्रंथात असे म्हटले आहे की, रामाच्या काळात हिमालय आणि विंध्य पर्वताची उंची सारखीच होती. परंतु आता दरवर्षी हिमालयाची उंची तीन फुटाने वाढते. त्यामुळे हिमालय उंच तर विंध्य पर्वत आहे त्याच उंचीचा आहे. या सर्वांचा अंदाज घेऊन त्यांनी पुरातत्व दृष्टीने प्रभू रामचंद्राच्या जन्माची तारीख लिहिली. त्यांच्या मते इ.स.पूर्व 4 डिसेंबर 7323 ही तारीख प्रभू रामचंद्र जन्माची आहे. अलीकडे पुरातत्व खात्याने प्लाटिनम सॉफ्टवेअरचा वापर करून प्रभू रामचंद्रांची जन्मतारीख काढली आहे. त्यानुसार प्रभू रामचंद्रांचा जन्म इ. स. पूर्व 10 जानेवारी 5114 या दिवशी झाला.

दशरथाचा पुत्र राम हा कौसल्येचा मुलगा होता आणि कैकयीच्या आग्रहाखातर भरताला राज्यावर बसवण्यासाठी दशरथाने प्रभू रामचंद्रास 14 वर्षांसाठी वनवासात पाठवले. त्यावेळी भरताने मोठ्या भावाचा आदर्श ठेवत त्याच्या पादुका घेतल्या आणि राज्य केले. वडिलांचा आणि आईचा आदर करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वनवास पत्करला तेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास केला. त्या काळात त्यांचे बंधू लक्ष्मणही त्यांच्यासमवेत राहिले. पुढे लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले. रामाने तिचा शोध घेऊन रावणाचा वध करून सीतेला मुक्‍त केले. हा सगळा संघर्षमय काळ वनवासात घडून आला. प्रभू रामचंद्र दंडकारण्यात वनवासात असताना त्यांची आणि अगस्ती ऋषी यांची भेट गोदावरीतीरी झाली. तसेच प्रभू रामचंद्रांना दक्षिणेत प्रवास करण्यास तुळजापूरच्या तुळजाभवानीने दिशादर्शन केल्याचे तुळजा महात्म्य या ग्रंथात नमूद केले आहे. त्यामुळे तुळजाभवानीला रामवरदायिनी असे म्हटले जाते.

प्रभू रामचंद्रांनी वानरांच्या साहाय्याने सेना उभारली आणि त्यांच्या मदतीने सेतू बांधला ही दंतकथा असे समजले जात होते. तथापि, नासा या अमेरिकन संशोधन संस्थेने फ्लोरिडा येथून उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रात सागरामध्ये दक्षिणेतील रामेश्‍वरपासून कोलंबोपर्यंत उत्तम पद्धतीने रामसेतू उभारलेल्याचे सज्जड पुरावे आढळले आहेत.
प्रभू रामचंद्रांना विश्‍वासाने मदत करणारा हनुमान दक्षिणेतील प्रवासात भेटला आणि तो प्रभू रामचंद्रांचा भक्‍त झाला. प्रभू रामचंद्रांनी वानरसेना उभी केली, याचा मतितार्थ असा आहे की प्रभू रामचंद्रांना दंडकारण्यात 14 वर्ष वनवासात वनवासींनी मदत केली आहे. वनातील मूळ रहिवासी असलेल्या भारतीय लोकांनी प्रभू रामचंद्रास त्यांच्या सुरक्षेसाठी, भविष्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक मूल्यासाठी मोठ्या प्रमाणात साथ दिली. श्रीलंकेपर्यंत म्हणजे सीतेच्या शोधाच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांना पोहोचवण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. हनुमान या प्रभावशाली आणि विश्‍वासू सहकाऱ्याचा उदय ही देखील यातील महत्त्वाची बाब होय.

प्रभू रामचंद्रानी जो संघर्ष केला तो केवळ सत्तेसाठी नव्हता तर मूल्यासाठी होता, हे रामायणातून लक्षात येते. प्रभू रामचंद्रांचा अंतिम काळ किंवा त्यांचे महानिर्वाण हे जलसमाधी तत्त्वानुसार घडून आले. आपले ऐतिहासिक कार्य संपवल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीत प्रवेश केला आणि या नदीच्या खोल पात्रात जाऊन त्यांनी आपल्या जीवनाची इतिश्री केली. प्रभू रामचंद्र आणि सीता यांची कथा आणि संघर्षमय मूल्य प्रस्थापनेची कथा आहे. एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असे प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांनी राज्य केले तेही काही मर्यादांचे पालन करीत केले. नीतीमत्ता व आचारतत्वे कधीच पायदळी तुडवली नाहीत. अयोध्येत परतल्यानंतर त्यांचा राज्यकाळ हा अत्यंत कल्याणकारी  राज्यव्यवस्थेचा आदर्श होता. प्रभू रामचंद्रांनी मानवता, लोककल्याण ही मूल्ये घेऊन आपला राज्यव्यवहार चोखपणाने केला. प्रभू रामचंद्रांचे पुत्र लव आणि कुश यांनी त्यांचा अश्‍वमेधाचा घोडा अडवला आणि प्रभू रामचंद्रांपेक्षाही आपण काकणभर सरस आहोत हेच सिद्ध केले.

हा अश्‍वमेधाचा घोडा जिथे अडवला ते स्थान औरंगाबादेतील सिल्लोडजवळील लवगड नांद्रा होय. सीतेच्या अपहऱणाची गोष्ट साकारणाऱ्या कथा बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. ज्या जटायूने ही बातमी प्रभू रामचंद्राला सांगितली आणि मगच प्राण सोडला त्या जटायूचे मंदिरही बीड जिल्ह्यात आहे. प्रभू रामचंद्रांच्या तत्त्वांचा, ध्येय उद्दिष्टांचा, मूल्यांचा परामर्श घेतला असता असे दिसते की प्रभू रामचंद्रानी आदर्श मूल्यांसाठी उत्कृष्ट, लोककल्याणकारी राज्य चालवले त्यामुळेच त्यास रामराज्य असे म्हटले आहे. महात्मा गांधीही अशाच रामराज्याचे पुरस्कर्ते होते आणि प्रभू रामचंद्रांच्या उच्च ध्येयवादाचे आणि मूल्यांचे पुरस्कर्ते होते. भारतीय संस्कृतींच्या देशी किंवा परदेशी अभ्यासकांनीही प्रभू रामचंद्रांच्या ध्येयवादी विचारांचा परामर्श घेताना त्यांच्यातील दीपस्तंभाची उंची विचारात घेतल्याचे दिसते. प्रभू रामचंद्रांचा आयुष्यकाळ त्रिपुरापासून रामेश्‍वरपर्यंत, रांचीपासून कराचीपर्यंत ब्रह्मदेशापासून गांधार देशापर्यंत सर्वदूर पसरला आहे. याचाच अर्थ अखंड भारताच्या उभाऱणीचा श्रीगणेशा प्रभू रामचंद्रांसारख्या आदर्श व ध्येयवादी राजाने केला असे म्हणता येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)