मर्दानी खेळाचे कौशल्य जपणण्याचे प्रयत्न

श्री शिवप्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाडा आजही कार्यरत
मेढा दि 13 प्रसाद शेटे /प्रभात विशेष
श्री शिवप्रतिष्ठान मर्दानी खेळाच्या आखाड्याने मर्दानी खेळाचे कौशल्य जपले आहे. हे कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोचावे आणि त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी या आखाड्याचे संस्थापक प्रवीण ओतारी प्रयत्न करत आहेत. शिवकालात आपले मावळे तयार करण्यासाठी मनोरंजनाचे कलाप्रकार म्हणून या मर्दानी खेळांना पुढे आणले गेल्याचे जुनी-जाणती माणसे सांगतात.
हलगीचा कडाडणारा आवाज कानावर पडू लागतो, कैचाळाच्या साथीने घुमकंही घुमू लागतं. भूमीला वंदन करून रिंगणात चौघेजण येतात. सभोवार जमलेल्यांच्या नजरा भिरभिरणाऱ्या काठीवर खिळलेल्या असतात. एकाचवेळी तिघांचे वार झेलत, प्रत्युत्तर देत फरिगदगा खेळणाऱ्या रणरागिणीचा आवेश तर अवर्णनीय असतो. मग, जमिनीवर एका रांगेत ठेवलेली लिंबं तलवारीच्या पात्याने झपकन उडवली जातात. लाठीचा खणखणाट घुमू लागतो आणि उपस्थितांचा श्वास रोखला जातो. हलगीच्या तालावर सुरू असलेल्या चित्तथरारक मर्दानी खेळाच्या प्रकारांनी रक्त कसं सळसळतं याचा उपस्थितांना एक विलक्षण अनुभव येतो. तास-दीड तास मर्दानी खेळातील रग दाखविणाऱ्या जिगरबाजांसाठी होणारा टाळ्यांचा कडकडाटही थांबण्याचं नाव घेत नाही.
चित्रपट असो , शिवपपुत्र शंभूराजे महानाट्य असो , मालिका असोत वा शिवजयंती आणि गणेशोत्सवातील मिरवणूक. देशातलं असं एकही राज्य नाही, की ज्यांनी जावळीच्या मातीने प्राचीन युद्धकला आणि मर्दानी खेळांच्या रूपाने टिकवलेला लढाऊ बाणा पाहिलेला नाही. तलवार, पट्टा, भाला, विटा या पारंपरिक शस्त्रात्रांचे जतन आणि ही शस्त्रे वाडवडिलांकडून आलेले कौशल्य जपण्याचे धडे इथल्या आखाड्यांतून मिळतात.
ही अस्सल अस्सल रग दिसते ती इथल्या अनेक गावांत . पूर्वी लढाईपूर्वी युद्धकलांचा सराव केला जायचा. इंग्रज भारतात आले आणि नंतरच्या काळात बंदुका आल्यावर पारंपरिक युद्धशस्त्रांचा वापर कमी झाला. पण, त्याचे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचे काम देशभरात फारच कमी ठिकाणी झाले. स्वातंत्र्यपूर्वच नव्हे तर शिवकालीन इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी आज कार्यरत असलेल्या तालमी, आखाड्यांनी मर्दानी खेळाचे कौशल्य जपले आहे. हे कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोचावे आणि त्याचे संवर्धन व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. शिवकालात आपले मावळे तयार करण्यासाठी मनोरंजनाचे कलाप्रकार म्हणून या मर्दानी खेळांना पुढे आणले गेल्याचे जुनी-जाणती माणसे सांगतात. राजर्षी शाहू महाराजांच्या काळात भवानी मंडपात मर्दानी कला प्रकारांच्या तीन-तीन दिवस स्पर्धाही व्हायच्या. कालौघात त्या लोप पावल्या तरी आजही सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने मर्दानी खेळ जपले आहेत.
मर्दानी खेळात महत्त्व असते ते तीन गोष्टींना. पवित्रा, नजर आणि शस्त्र फिरवण्याची गती. पवित्रा म्हणजे तुमच्या शरीराचा समतोल कसा साधता यावर तुमची प्रतिकाराची शक्ती ठरते हे साधं तत्त्व मर्दानी खेळांच्या सरावावेळी उलगडते. तलवारीपासून भाल्यापर्यंत कुठलेही शस्त्र घेतले तर त्यात वार कसा करायचा याचे किमान प्रकार पडतात. तलवार हातात धरली तर त्याचा वार शक्‍यतो थेट असतो. मर्दानी खेळाच्या भाषेत शीरवार, बाजूवार, बगलवार असेही प्रकार येतात. बैठेवार आणि चोरवारही असतात. वार म्हणजे तोडणे. त्यामुळे दुधारी असलेल्या पट्ट्याचा वार आडवाच फिरतो; कारण समोरच्या शत्रूला एका झपाट्यात संपवायचे असते. पट्टा आडवा पकडावा लागतो, तर तलवार सरळ. लांब अंतरावरच्या शत्रूला टिपायचे तर भालाच चांगला, पण भालाफेक केल्यानंतर हाती शस्त्र उरत नाही. त्यामुळे मराठ्यांनी विकसित केलेले शस्त्र म्हणजे विटा. अस्त्र आणि शस्त्र या दोन्ही प्रकारांत ते वापरता येतं. इंग्रजांच्या काळात या शस्त्राला गौरवले गेले. लांब अंतरावरच्या शत्रूला टिपून पुन्हा फिरून आपल्या हाती येणारे हे शस्त्र. पन्हाळगडावर वीर शिवा काशीद यांच्या उभारलेल्या पुतळ्याच्या हातीही हेच शस्त्र आहे. यात फेक अचूक लागते, अन्यथा ते बुमरॅंग होण्याची शक्‍यता असते. हे शिवकालीन शस्त्रभांडार आजही जपले आहे. हे सारे शिकवले जाते, ते मर्दानी खेळांमध्ये. अर्थात, प्राचीन युद्धकला किंवा स्वसंरक्षण, बलोपासनेचा मुख्य उद्देश म्हणून. कालानुरूप मर्दानी खेळाच्या प्रकारात बदल झाले. शस्त्र वापरण्यास बंदी असल्याने ढाल-तलवारीऐवजी फरीदगा आला. लढाईचे प्रत्यंत्तर देणाऱ्या, अचूकतेचा मंत्र देणाऱ्या, तलवारीने लिंबू कापण्याच्या प्रकारानेही मूळ धरले. झोपलेल्या मावळ्याच्या मानेवर केळं ठेवून त्याचे तलवारीच्या पात्याने अचूक तुकडे करण्याचा प्रकारही थरारक असतो.

मेढा येथील आखाड्याचे संस्थापक प्रवीण ओतारी यांनी आज ही जावळीत ही कला जिवंत ठेवलीय या वस्तादांनी आजच्या पिढीकडे देत संवर्धनाच्या पातळीवर नेली. आज या युद्धकला प्रशिक्षण संस्थेमध्ये या मर्दानी खेळाचे शास्त्रोक्त आणि मोफत शिक्षण आखाड्यांतून मिळते.रणरागिणी प्राचीन युद्धकलेचे, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करू लागल्यावर उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.आजही पाच वाजले की स्वयंस्फूर्तीने मुले मुली जमू लागतात. वय वर्षं तीनपासून 25-30 वर्षांपर्यंतचे सगळे यात सहभागी होतात. प्रत्येक आखाड्यात दोन तास सराव सुरू राहतो. लाठी हे कुणालाही, कुठेही सहज उपलब्ध होणारे शस्त्र. त्यामुळे महिलांना स्वसंरक्षणाचे एक मोठे साधन म्हणून याकडे पुण्या-मुंबईची सुशिक्षित कुटुंबे पाहतात. त्यामुळे मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देणारी उन्हाळी, हिवाळी प्रशिक्षण शिबिरेही जोर धरू लागली आहेत. मर्दानी खेळाचा हा विस्तार फक्त कोल्हापूर, साताऱ्यात मर्यादित राहिला नाही, तर पुणे, मुंबई, गोवा अशा शाखाही निघाल्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने गाव सोडून गेलेली मुले इतरांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतात, ती या कलांच्या संवर्धनासाठीच.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)