मरावे परी… देहरूपी उरावे! 

डॉ. जयदेवी पवार

ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे, हा निसर्गाचा नियम आहे. माणसाबरोबरच पशू-पक्षी आणि वृक्ष-वेलींनाही तो लागू आहे. परंतु माणूस अमर झाल्याच्या कहाण्या पुराणात मोठ्या संख्येनं पाहायला मिळत असल्यामुळं अमर होणं खरंच शक्‍य आहे का, हा प्रश्‍न माणसाला उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात पडल्याचं स्पष्ट होतं. विज्ञानाच्या साह्यानं माणसाला अमर करण्यासाठी, किमान दीर्घायुषी करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न आणि प्रयोग सुरू आहेत. अशा प्रयोगांची माहिती करून घेणं मनोरंजक ठरेल.

“मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ असं म्हटलं गेलं; कारण मेल्यानंतर देहरूपी उरणं शक्‍य नाही. अमर कुणीच होऊ शकत नाही आणि त्यामुळंच माणसाला सर्वाधिक भीती मृत्यूची वाटते. जगात आज एकही अमर माणूस नाही. तसेच अशी कोणतीही गोष्टही नाही, जी माणसाला अमर करू शकेल. ज्याने जन्म घेतला त्याचा मृत्यू अटळ आहे, हेच शाश्‍वत सत्य. केवळ माणूसच नाही, तर कोणताही जीव एक ना एक दिवस हे जग सोडून जाणार, हे निश्‍चित आहे. मनुष्य किंवा अन्य कोणताही प्राणी दीर्घायुषी असू शकतो; परंतु अमर असू शकत नाही. परंतु इतर जीवजंतूंच्या तुलनेत निसर्गाने मानवाचा मेंदू अधिक तल्लख बनविला आहे. या मेंदूचा वापर करून माणसाने अनेकदा अशा गोष्टी करून दाखविल्या आहेत, ज्या शक्‍य आहेत असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं.

ज्याला चमत्कार म्हणता येईल, अशा गोष्टी विज्ञानाच्या साह्यानं करण्यात माणूस यशस्वी झाला. त्याचप्रमाणं एखादी व्यक्‍ती अमर होऊ शकते, ही सध्या अविश्‍वसनीय वाटणारी किंवा चमत्कार वाटणारी गोष्ट आहे. ती शक्‍य करता येते का, याचा शोध माणूस अनेक पातळ्यांवर घेत आहे. पुराणात अमरत्वाच्या अनेक कहाण्या आहेत आणि माणसाला अमर करणाऱ्या अनेक जडी-बुटी अस्तित्वात असल्याचंही सांगितलं गेलं आहे. या कल्पना की वास्तव, याचा माणसाला बोध झालेला नाही. परंतु नवनवीन तंत्रांच्या साह्यानं माणसाला अमर होता येईल का, याचा शोध मात्र घेतला जातो आहे.

अमरत्व प्राप्त करण्याचा विचार किंबहुना तसा प्रयत्नही माणूस प्राचीन काळापासून करतो आहे. विज्ञानाच्या साह्यानं माणसाला अमर करणं शक्‍य आहे का, याचा वेध आताही घेतला जात आहे आणि वेगवेगळ्या तंत्रांच्या साह्यानं ते शक्‍य असल्याची शक्‍यता दिसत असल्यामुळं संशोधन पुढेच जात आहे. येणाऱ्या काळात कदाचित माणूस आपलं आयुष्य वाढविण्याची काही तंत्रं विकसित करू शकतो. अशा काही वस्तू आणि तंत्रज्ञानाचा सुगावा लागला आहे. आयुष्य वाढविण्याचं तंत्र माणसाला गवसलं तर अमर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास किती अवधी लागणार? शास्त्रज्ञांनी अशा अनेक बाबींचा उलगडा केला असून, त्यावर संशोधन सुरू आहे. हे संशोधन यशस्वी झालं, तर कदाचित आगामी काळात आपल्याला अमर बनण्याचा मार्ग सापडू शकेल. हे घडेल तेव्हा घडेल; पण सध्या तरी अशा काही गोष्टी जाणून घेणं निश्‍चितच मनोरंजक ठरेल.

भूक लागली तर एक गोळी घ्यायची, की भरलं पोट… अशा एका गोळीविषयी तुम्ही नक्‍कीच ऐकलं असेल. आगामी काळात अशी एखादी गोळी उपलब्ध होऊ शकेल, ज्यामुळं माणसाचं आयुष्य वाढवणं शक्‍य आहे. “लॉंगीव्हिटी पिल’ म्हणजेच आयुष्य वाढविणारी गोळी, या नावानं ही संकल्पना मूळ धरू पाहत आहे. ही गोळी खाल्ल्यामुळं माणूस केवळ दीर्घायुषीच होईल असं नाही, तर इतरांपेक्षा तो अधिक आरोग्यसंपन्न जीवन जगू शकेल, असं सांगितलं जातंय. अशी गोळी 2019 पर्यंत बाजारात उपलब्ध होईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. शास्त्रज्ञ असंही सांगतात की, ही गोळी घेतल्यामुळं माणसाचं सरासरी आयुर्मान 100 ते 110 वर्षांपर्यंत वाढू शकेल. सध्या सरासरी 70 ते 80 वर्षे माणूस जगू शकतो. या गोळीत मुख्य क्षारयुक्‍त पदार्थ म्हणून मेटाफॉर्मिनचा वापर करण्यात येईल. सध्या मधुमेहाच्या रुग्णांना हा क्षारयुक्‍त पदार्थ देण्यात येतो. तोच अल्प प्रमाणात या गोळीत असेल. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, मधुमेह झालेल्या व्यक्‍ती सामान्य व्यक्‍तींपेक्षा अधिक काळ जगू शकतात, ते याच पदार्थामुळं. या गोळ्यांचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला असून, त्याचे सकारात्मक परिणाम जाणवले आहेत. परंतु माणसावर या गोळीचा प्रयोग करण्यापूर्वी आणखी काही चाचण्या घेतल्या जाणं आवश्‍यक आहे, असं शास्त्रज्ञ म्हणतात. अर्थात आयुष्य वाढवणारी गोळी थेट मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध झाली, तर ती कुणाला नकोय?

कधीकधी चित्रपटांमधून आपल्याला “व्हॅम्पायर’चं दर्शन घडतं. हे विचित्र वटवाघळासारखे प्राणी माणसाचं रक्‍त शोषून घेतात आणि दीर्घायू होतात. शक्‍यतो तरुणांचं रक्‍त हे व्हॅम्पायर शोषतात, असं चित्रपटांत दाखवलेलं असतं. हे विचित्र प्राणी कधी-कधी अमर झाल्याचंही दाखवलं जातं. वयोमानानुसार रक्‍त जुनं होत असावं का? नवीन रक्‍त निर्माण करण्याची क्षमता कमी होत असावी का? अशा स्थितीत वृद्धांच्या शरीरात तरुण रक्‍त सोडलं तर आयुर्मान वाढेल का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं शोधली जात आहेत. शास्त्रज्ञांनी यासंदर्भात उंदरांवर प्रयोग केला. तुलनेनं वृद्ध असलेल्या उंदरांच्या शरीरात तरुण उंदरांचं रक्त सोडून शास्त्रज्ञांनी त्यांचं अवलोकन केलं. सामान्यतः वृद्ध उंदीर जितके दिवस जगला असता, त्यापेक्षा किमान एक महिना अधिक तो जगल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे. हा प्रयोग माणसांवर करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. हे शक्‍य झालं तर माणूस आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो आणि भविष्यात हाही एक मार्ग अवलंबिला जाणं शक्‍य आहे, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

मानवी शरीर निष्प्राण होण्यापर्यंतच्या प्रक्रियेची सुरुवात एखादा अवयव निकामी झाल्यामुळं होते. परंतु मानवी अवयव प्रयोगशाळेतच तयार करण्यात यश मिळालं, तर..? एखादा अवयव निकामी झाल्याबरोबर त्याच्या जागी कृत्रिम अवयव बसवून माणसाचं आयुष्य वाढवता येऊ शकेल. या पर्यायावर मात्र मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून, काही प्रमाणात या प्रयत्नांना यशही मिळत आहे. माणसाला एखादा अवयव खराब झाल्यामुळं मृत्यूच्या जवळ जावं लागतं. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा अवयव त्याजागी बसवावा, तर कधी रक्तगट जुळत नाही तर कधी अन्य बाबी जुळत नाहीत. जरी सर्वच बाबी जुळल्या, तरी माणसाच्या सहमतीशिवाय अवयवदान शक्‍य नाही. हृदयासारखा नाजूक आणि गुंतागुंतीचा अवयव खराब झाल्यास माणसाचा अकाली मृत्यू होऊ शकतो.

असा अवयव कुणी दान केला, तरच बसविता येऊ शकतो. त्यासाठीही शरीरातील अनेक गोष्टी अवयवदात्याच्या शरीराशी जुळाव्या लागतात. काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी एक वेगळाच प्रयोग करून पाहिला. श्‍वासनलिकेचा कर्करोग झालेल्या एका व्यक्‍तीची श्‍वासनलिका काढून टाकण्यात आली होती. त्यामधील पेशींचा वापर करून शास्त्रज्ञांनी कृत्रिम श्‍वासनलिका प्रयोगशाळेत तयार केली. मग ही कृत्रिम श्‍वासनलिका संबंधित व्यक्‍तीच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शास्त्रज्ञांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. हृदयासारखे नाजूक अवयव याच धर्तीवर प्रयोगशाळेत तयार करून त्यांचं प्रत्यारोपण करणं शक्‍य झालं, तर माणसाचं आयुष्य वाढवण्यास नक्‍कीच मदत होणार आहे.

सायबोर्ग हा शब्द तुम्ही अलीकडे ऐकला असेल. अर्धा माणूस आणि अर्धं यंत्र असा या शब्दाचा अर्थ आहे. माणसाचे काही अवयव यंत्रांचे सुटे भाग बदलावेत तसे बदलता आले तर..? या शक्‍यतेवरही संशोधन सुरू आहे. यंत्रासारखे अवयव असलेली माणसं हॉलीवूडच्या चित्रपटांत आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पडद्यावरचं हे दृष्य वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. हात आणि पाय बदलण्याचे प्रयोग शास्त्रज्ञांनी केले आहेत आणि ते यशस्वीही झाले आहेत. भविष्यात शरीराचे बहुतांश अवयव अशाच प्रकारे बदलता येतील आणि माणूस कृत्रिम अवयवांच्या आधारे सायबोर्ग अवतारात जिवंत राहू शकेल, असं शास्त्रज्ञांना वाटतं आहे. कृत्रिम अवयवांना मृत्यू नसेल. त्यामुळं माणूसही आपोआप दीर्घायु होईल.

मृत्यूनंतर शरीर संपतं; परंतु आत्मा अमर असतो, असं आपण ऐकतो. शास्त्रज्ञ आत्म्याची संकल्पना मानत नाहीत. परंतु शरीराला चैतन्य देणारा मुख्य अवयव म्हणून मेंदूच महत्त्वाचा असतो. मृत्यूनंतर मेंदू जिवंत ठेवता येईल का, या शक्‍यतेवर मात्र शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. माणसाला डिजिटल इम्‌मॉर्टेलिटी म्हणजेच डिजिटल अमरत्व देण्याचा हा प्रयत्न आहे. असं करण्यासाठी मेंदूला एका कम्प्युटर मीडियावर अपलोड केलं जाईल. त्यामुळं मेंदूतील सगळा डाटा कम्प्युटरवर जाईल. शरीर मेल्यानंतरही डिजिटल रूपात मानवाला जिवंत ठेवण्याचा हा प्रयत्न सध्या कल्पनेतच असला, तरी शास्त्रज्ञ त्यावर काम करीत आहेत. 2050 पर्यंत माणसाच्या मेंदूचा डाटा संगणकावर संकलित करण्याचा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्‍वास शास्त्रज्ञांना आहे. माणूस अमर होऊ शकेल की नाही, हे आताच सांगता येत नाही; पण हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा मेंदू मात्र नक्‍कीच अमर होईल.

आजकाल छपाईतंत्रात प्रचंड क्रांती झाली असून, शास्त्रज्ञांनी थ्री-डी प्रिंटिंगचे तंत्रही शोधून काढले आहे. या प्रिंटिंगचा आधार घेऊन व्यक्‍तींचे पुतळ्यासारखे वाटणारे फोटो काढणारे स्टुडिओही काही ठिकाणी उभे राहिले आहेत. एवढेच नव्हे तर थ्री-डी प्रिंटिंगच्या साह्याने शास्त्रज्ञांनी मोठमोठ्या रॉकेटचे सुटे भाग बनविण्यातही यश मिळवलं आहे. अशाच प्रकारे मानवी अवयवांच्या थ्री-डी प्रिंट काढल्यास त्यापासून अवयव तयार करता येतील का, यावर सध्या संशोधन सुरू आहे. मानवाचे सर्व अवयव आगामी काळात थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने तयार करणं शक्‍य असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एखादा अवयव निकामी झाल्यामुळं येणारा मृत्यू टाळून माणसाला शतायुषी करणं, हा यामागचा हेतू आहे. एकंदरीत माणसाला अमर करण्यासाठी विज्ञान आणि शास्त्रज्ञांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून, ते यशस्वी झाल्यास अमर बनणं अशक्‍य राहणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)