डेक्कन कॉलेजचा पुढाकार
राज्य मराठी विकास संस्थेचे आर्थिक पाठबळ
पुणे- मराठी बोलींचा अभ्यास करण्यासाठी ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण’ हा प्रकल्प डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था व राज्य मराठी विकास संस्था यांनी हाती घेतला आहे.
भाषेचे जसे एक शास्त्र आणि व्याकरण असते, तसेच बोलींचेही व्याकरण असते. मात्र, हा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आतापर्यंत कुणीही अभ्यास केला नाही. तो करण्यासाठीच या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.
– डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी, भाषाशास्त्र विभाग, डेक्कन कॉलेज
मराठी बोलींचे व्याकरण काय आहे? त्यासंबंधी मराठी भाषेतील भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवर आढळणाऱ्या काही निवडक व्याकरणिक विशेषांचे भाषावैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करणे आणि भाषिक नकाशे तयार करणे हा या प्रकल्पातील महत्त्वपूर्ण उद्देश आहे. या प्रकल्पाचा भविष्यात अभ्यासक आणि संशोधनाचा निश्चितच उपयोग होणार आहे.
या प्रकल्पासाठी डेक्कन कॉलेज येथे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. याचा समारोप शुक्रवारी झाला. त्यावेळी डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी प्रकल्पाची घोषणा केली. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर उपस्थित होते. या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ राज्य मराठी विकास संस्थेने दिले आहे. डेक्कन कॉलेजचे उप-कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी, कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य ऍड. दादासाहेब बेंद्रे आणि मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष प्र. ना. परांजपे आदी या वेळी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा