मराठीतील आद्य शिलालेख

श्रुती कुलकर्णी

राजा केसिदेवराय याचे कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख- “चामुण्डराजे करवियले” हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. ती समजूत आता मागे पडली असून तो मान अक्षी शिलालेखाला मिळाला आहे. अक्षी हे गाव महाराष्ट्राच्या रायगड (कुलाबा) जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अलिबागपासून दक्षिण दिशेस पाच कि.मी. अंतरावर अलिबाग-मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख कुलाबा गॅझेटीयर 1883 मध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर असा आहे-
गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री –
वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा –
न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतु : प्रधा-
वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-
लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ
कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु
मीची वआण । लुनया कचली ज -।
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोदला असून त्या शिळेच्या माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे खोदकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. याचा अर्थ, जगी सुख नांदो ओम पश्‍चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत 934 परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीच्या बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. लुनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख 16 मे सन 1012 अशी आहे.
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख- “वाछि तो विजेया होईवा ।।’: कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्‍य “वाछि तो विजेया होईवा ।।’ असे मराठीत आहे. त्यात काळाचा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके 940 असे कोरले आहे. साधारणतः इ.स.1018 या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके 982 (इ.स. 1060) होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)