मराठा समाज आरक्षणाचा निर्णय परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट करण्याची मागणी

मुख्यमंत्री फडणवीसांशी समक्ष भेटून चर्चा , येत्या 6 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चाची सोलापुरात बैठक

नगर: मराठा समाज एसईबीसी आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सदर निर्णयास आव्हान देऊन मराठा आरक्षण अडचणीत आणण्याचे प्रयत्नकाही विघ्नसंतोषी प्रवृत्तींकडून होत आहेत. मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी राज्य व केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून घटनात्मक व कायदेशीर संरक्षण द्यावे.यासाठी प्रसंगी घटना दुरुस्ती करून अनुच्छेद 31ब व 31क चे संरक्षण देत सदरचा निर्णय परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट करण्यासाठी आवश्‍यक ते प्रयत्न त्वरीत केले जावेत.तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अन्य प्रलंबित मागण्यां मागे पडता कामा नयेत.या बाबत सरकारने तातडीने पुढील कार्यवाही सुरू करावी अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे समक्ष भेटून केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा आरक्षणाला घटना दुरुस्ती करून अनुच्छेद 31ब व 31क चे संरक्षण देण्यात यावे,एसईबीसी आरक्षणाचा निर्णय राज्य घटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट करावा,या मागणीबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून सर्व बाजू विचारात घेत कृती करू असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.केंद्रीय स्तरावर मराठा समाजास आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली.याबाबतही लवकरच केंद्र सरकारला शिफारस करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

याखेरीज कोपर्डी आरोपींवरील उच्च न्यायालयातील खटला गतिमान करावा,ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखणे,मराठा वस्तीगृह,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेचा लाभ बॅंकांकडून होत असलेल्या अडवणुकीमुळे मिळत नाही,सारथी संस्था कार्यान्वित झालेली नाही,नाहक खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेल्या अनेक मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे,एसईबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर महावितरण किंवा इतर ठिकाणी सुरू झालेल्या भरती प्रक्रियांमध्ये एसईबीसीच्या जागाच दर्शविलेल्या नाहीत,सन 2014च्या ईएसबीसी आरक्षणातील प्रलंबित निवडी करण्यात याव्यात,असे अनेक विषय समन्वयकांनी स्पष्टपणे तपशीलासह मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

सर्व प्रश्‍नांबाबत जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली संबंधित विभागांचे अधिकारी,मंत्री यांची अधिकृत सविस्तर बैठक घेऊ असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळास दिले. सद्यस्थितीतील सर्व घडामोडींबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील समन्वयकांना विचारात घेऊन पुढील भूमिका ठरविली जाईल.येत्या 6 जानेवारीला त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक सोलापूर येथे प्रस्तावित असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. या शिष्टमंडळात संजीव भोर पाटील,शांताराम कुंजीर,राजेंद्र कोंढरे,रघुनाथ चित्रे, माऊली पवार,अंकुश कदम,वीरेंद्र पवार, धनंजय जोगदंड,सुधीर भोसले,अरविंद मोरे विनोद साबळे,तेजस पवार,वैभव जाधव, इंद्रजीत निंबाळकर,अंकत चव्हाण,हनुमंत मोटे,अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)