मराठा समाजाला “ओबीसी’ प्रवर्गात आणू नका

विरोध करण्याचा राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचा पवित्रा

पुणे – मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग या स्वतंत्र प्रवर्गात टाकणे म्हणजे राज्य शासनाकडून सुरू असणारा शब्दच्छल आहे, मुळातच हे शक्‍य नाही. त्यामुळे पर्यायाने या समाजाला “ओबीसी’ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसे झाल्यास “ओबीसी’ समाज त्याला विरोध करेल, असे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आले.

यासंदर्भात फेडरेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी संघटक सचिन माळी, निमंत्रक शंकरराव लिंगे, सुधीर पाषाणकर, डॉ.शिवाजी दळणकर उपस्थित होते. मराठा समाज आरक्षणासाठी वेगळा प्रवर्ग तयार करणे चुकीचे आहे. राज्य शासन जरी म्हणत असले, तरी मराठा समाज हा “ओबीसी’मध्येच समाविष्ट करण्यात येणार आहे. वेगळा प्रवर्ग देऊन दिलेले आरक्षण हे 50 टक्‍क्‍यांवर जाणार असल्याने ते न्यायालयातून रद्द होणार व मराठा “ओबीसी’च्या 27 टक्‍क्‍यांमध्येच सामील होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने “ओबीसी’ समाजाची दिशाभूल केली आहे, असा आरोप सचिन माळी यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले, तर आमचा विरोध नाही पण “ओबीसी’ कोट्यात देऊ नये. त्यामुळे राज्यात मराठा-“ओबीसी’ संघर्ष सुरू होऊ शकतो. या संदर्भात मुंबईतील “ओबीसी’च्या नेत्यांना भेटून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास समजू शकतो, पण सामजिकदृष्ट्या मराठा समाज मागस आहे, हा निष्कर्ष कुठल्या आधारावर काढण्यात आला, याबाबत आमची शंका आहे. कारण, आज राज्यात सर्वात जास्त मराठा हा समाज आहे. तसेच राज्यातील सगळ्या शिक्षणसंस्था व कारखाने हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या हा वर्ग मागास कसा होऊ शकतो, हे पाहावे लागेल.

मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल जाहीर झालेला नसताना मुख्यमंत्र्यांनी 1 डिसेंबर ला जल्लोष करण्याचे आश्‍वासन मराठा समाजाला कसे दिले? याचा अर्थ हा अहवाल फुटला होता. त्यामुळे या अहवालाबाबतसुद्धा आता शंका व्यक्त होत आहे. असाही आरोप यावेळी करण्यात आला. आयोगाच्या सुनावण्या सुरू होत्या, त्यावेळीसुद्धा अनेक निवेदने स्वीकारण्यात आली नाहीत. निवेदन देण्यास गेलेल्यांना मारहाणीसारखेसुद्धा प्रकार घडले आहेत. यासंदर्भात सर्व “ओबीसी’ समाज आता एकत्रित येणार आहे, जर मराठा समाजाला “ओबीसी’चा दर्जा दिला जात असेल, तर येत्या निवडणुकीत 52 टक्के “ओबीसी’ समाज हा भाजप-शिवसेनेच्याविरोधात जाईल, असा इशाराही यावेळी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)