मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीच्या ठरावाला एकमताने संमती

पाटण पंचायत समिती सभा : बांधकाम, शिक्षण विभागाचा आढावा
पाटण, दि. 1 (प्रतिनिधी) – राज्यभर सुरु असलेल्या मराठा आंदोलनाबाबत शासनाने साकारात्मक भूमिका घेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या समाजाने अत्यंत शांततेच्या मार्गाने यापूर्वी मोर्चे काढले होते. आता मात्र आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार मराठा समाजाने घेतला आहे. त्यामुळे आणखी या समाजाचा अंत न पाहता शासनाने या समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, असा ठराव पंचायत समितीच्या सभेत संमत करण्यात आला.
पंचायत समितीची मासिक बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पार पाडली. यावेळी सभापती उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार यांची उपस्थिती होती. दरम्यान मराठा आंदोलनात बळी गेलेल्या तसेच दापोली विद्यापिठातील पोलादपूर दुर्घटनेत बळी गेलेल्या व तालुक्‍यातील जेष्ठ नेते मधुकर काळे गुरुजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे या थोर विभूतींना ही सभागृहाने आदरांजली वाहिली.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आज झालेल्या पंचायत समितीच्या सभेतही पडसाद उमटले. सभापतींसह सर्व सदस्यांनी मराठा सामाजाच्या वतीने भावना व्यक्‍त केल्या. शासनाने मराठा समाजाचा आणखी अंत पाहू नये, हा समाज पुढारलेला असला तरी आर्थिक विषमतेत सापडलेला आहे. या समाजात फार थोडी मंडळी आर्थिकदृष्ट्या सक्षम असली तरी इतर घटक आजही पिचलेल्या अवस्थेत आहे. याला आरक्षणाशिवाय पर्याय नसल्याने शासनाने गांभिर्याने याचा विचार करायला हवा. अन्यथा मराठा समाजाची आंदोलने आणखी तीव्र स्वरुपाची होतील. परिस्थिती शासनाच्या अवाक्‍याबाहेर जाईल. यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असा ठराव सभेत संमत करण्यात आला.
यानंतर सभेच्या कामकाजास सुरवात झाली. पहिल्यांदा पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेण्यात आला. पशुसंर्धन विभागातील दवाखान्यांमध्ये ओल्या पार्ट्या होत असून ही पद्धत बंद करावी. काही कर्मचारी दवाखान्यात दारु पिवून येत असल्याचा गंभीर आरोप प्रतापराव देसाई यांनी केला. तर 19 पैकी 12 दवाखान्यांना आयएसओ नामांकन मिळाले असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. तसेच पाच दवाखान्यांच्या नामांकनासाठी प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती त्यांनी दिली.
पंचायत समितीच्या कृषी विभागात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेती औजारे उपलब्ध असून त्याचा लाभ जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी राजाराम लोखंडे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत 45 कामे मंजूर झाली असून लवकरच त्याची निविदा प्रक्रीया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 13 कामे मंजूर झाली आहेत. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कामांमध्ये यावर्षी 18 पैकी 12 कामांना मंजूरी मिळाली आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पामध्ये अंगणवाडी 10, मदतनीस 15, मिनी अंगणवाडी सेविका 33 तर पर्यवेक्षक 11 व 2 बालविकास आधिकारी अशी पदे रिक्‍त आहेत. अंगणवाडी मधील मुलांच्या औषधांसाठी लोकसहभागातून प्रयत्न करावे लागत आहेत. पोषण आहाराचेही अनुदान अद्याप मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.
मराठा समाजाच्या भावना तीव्र स्वरुपाच्या असून याबाबत आंदोलने शांततेत व्हावीत. एसटी बसचे नुकसान करुन आरक्षणाचा प्रश्‍न मिटणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने बसचे नुकसान करु नये, अशी विनंती आगार प्रमुख उथापे यांनी केली. यावेळी सदस्य बबन कांबळे यांनी कोयना विभागातून येणाऱ्या एसटी बसचे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली. तर राजाभाऊ शेलार यांनी पाटण-नवजा बस मानाईनगर मधून परत फिरते. त्यामुळे पुढे नवजातील प्रवाशांना तीन किलो मीटर पायी चालत जावे लागते. त्यामुळे ही बस पुढे पाठवा अशी विनंती केली.
पाटण महावितरणचा कारभार सुधारत नसून कोयना विभागात वारंवार वीज खंडीत होते. याला अधिकारीच जबाबदार असून ऐन उन्हाळ्यात संबंधित कामाची देखभाल का करण्यात आली नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे अश्‍वासन अभियंता कांबळे यांनी दिले.तर कुंभारगाव गणातील सदस्या रुपाली मोरे यांनी महावितरणच्या कारभाराचे पाढेच वाचले. लाईटबील सभागृहाला दाखवत 300 च्या जागी 1700 रुपये विज बिल आल्याचे त्यांनी उपस्थित आधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिले. आरोग्य विभागात सध्या औषधांचा तुटवडा असल्याचे प्रतापराव देसाई यांनी सभागृहाचे निर्दशनास आणून दिले. राज्यात औषधे खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा हा परिणाम आहे का? असाही प्रश्‍न तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक साळुंखे यांना विचारला. त्यावर सगळीकडे ही परिस्थिती असून गरजेच्या औषध खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्‍यातील 21 ग्रामपंचायतींचे पाणी नमुने दुषीत आढळले असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाचा आढावा देताना गटशिक्षण अधिकारी राजकुमार निकम यांनी ढेबेवाडी विभागातील मानेवाडी शाळेला आयएसओ नामांकन मिळाले असल्याचे सांगितले. तर तालुक्‍यात 159 जागा अद्यापही रिक्‍त आहेत. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीला विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक वनीकरण विभागाने काळगाव ते करपेवाडी या ठिकाणी झाडे न लावताच सभागृहाला खोटी माहिती दिली असल्याचा आरोप पंजाबराव देसाई यांनी केला. तालुक्‍यातील महिलांचे 51 बचतगट नव्याने स्थापन केल्याचे प्रतिभा चिंचकर यांनी सांगितले. मळे, कोळणे, पाथरपुंज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाचणी तसेच भात पिकांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न गरजेचे आहेत, असे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)