मराठा समाजाची 7 एप्रिलला कोल्हापुरात गोलमेज परिषद

पिंपरी – मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 58 मूक मोर्चा काढत हिवाळी अधिवेशनात हल्लाबोल आंदोलन केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अद्यापही बैठकीला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष समितीची पुढची दिशा ठरविण्यासाठी येत्या शनिवारी (दि.7) दुपारी तीन वाजता कोल्हापुरमधील रेसिडेंन्सी क्‍लब येथे राज्यातील मराठा समाजाच्या सर्व संघटनांची गोलमेज परिषद’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. मधुकरराव पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष आबा पाटील, कोकण विभाग अध्यक्ष विलास सावंत, मराठा युवा अध्यक्ष रविंद्र खोत, ठाणे विभाग अध्यक्ष अविनाश पवार, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट सर, मराठा युवा संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, मराठवाडा युवा अध्यक्ष दत्ता मोरे आदी उपस्थित होते.

सुरेश पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी काढलेल्या मोर्चातून समाजाने प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन सरकारने फसवे अध्यादेश काढून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज काढण्यासाठी एकही टक्‍का अनुदान दिले नाही. उलट हे कर्ज मिळविण्यासाठी आर्थिक मागास प्रवर्गाच्या अनेक अटी लादल्या. शैक्षणिक इबीसी सवलत 60 टक्‍क्‍यांवरुन 50 टक्‍यांवर आणली. मराठा समाजाला पुढे करुन काढलेल्या सर्व अध्यादेशांमध्ये एकाही अध्यादेशात “मराठा समाज’ अशी नोंद नाही. प्रत्येक अध्यादेशामध्ये मराठा समाजाच्या युवकांना कसा घेता येणार नाही याची दक्षता घेतली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कोपर्डी प्रकारणातील आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत शासनाकडून पाठपुरावा करण्यात यावा. मराठा आरक्षण शैक्षणिक वर्ष 2018 सुरु होण्यापूर्वीच लागू करण्यात यावे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाचा गैरवापर रोखण्यासाठी तालुका व जिल्हावार समित्या स्थापन करण्यासंदर्भात शासन परिपत्रक काढण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालास हमी भाव देण्यात यावा. शाहु महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही स्वायत्त संस्था त्वरित कार्यन्वीत करण्यात यावी व मराठा समाजासाठीच असावी. शासनाने जाहीर केलेल्या मराठा वसतीगृहाचे बांधकाम सुरु करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

शासकीय अध्यादेशांची करणार होळी
भाजप सरकारने आतापर्यंत काढलेले सात अध्यादेश मराठा समाजाच्या मागण्यांना हरताळ फासणारे आहेत. या सातही अध्यादेशांची सकल मराठा समाजाच्या वतीने होळी केली जाणार आहे. तसेच आता मूक मोर्चा काढून मागण्या मान्य न झाल्याने गनिमी काव्याचा वापर करुन, “ठोक मोर्चा’ काढणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)