मराठा समाजाचा सरकारवर भरोसा नाय

भवानीनगर- सध्याचे सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. 1 तारखेला जल्लोष करा, असे सांगत जरी असले तरीही मराठा समाजाचा या सरकारवर आता विश्‍वास राहिलेला नाही. का आहे मराठा सवांद यात्रा याबाबत साधारण 12 मुद्दे उपस्थित करून त्याची पत्रकेही यावेळी वाटण्यात आली. या सर्व घटनामुळेच मराठा समाजाच्या वतीने हा मराठा संवाद यात्रा मराठा क्रांती मोर्चा काढलेला आहे. आतातरी सरकारला जाग येईल का असा सवाल समाजाने उपस्थित केला आहे.
मुंबई विधानभवनावर सोमवारी (दि. 26) धडक मराठा क्रांती मोर्चा निघणार असल्याने मराठा समाजात जनजागृती होण्यासाठी शुक्रवार (दि. 16) ते रविवार (दि. 25) दरम्यान पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा आयोजित मराठा संवाद यात्रा काढण्यात आली आहे, या यात्रेचे भव्य असे स्वागत भवानीनगर (ता. इंदापूर) येथे मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले, त्यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविषयी संतप्त भावना व्यक्‍त केल्या. दरम्यान, आज सकाळी 10 वाजता या यात्रेचे भवानीनगरमध्ये आगमन झाले त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे प्रशांत पवार, तालुकाध्यक्ष सचिन अनपट, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, शशी निंबाळकर तसेच सर्व मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पहिले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पूजा करण्यात आली.
मराठा क्रांती (मूक)मोर्चा महाराष्ट्रासह देशात व परदेशात 58 मोर्चे अत्यंत शिस्तीने, संयमाने व शांततेने निघाले. समाजाच्या न्याय मागण्यांसाठी हा लढा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सुरुच ठेवायचा आहे. मराठा आरक्षण व समाजाच्या सर्वांगीण मागण्यांची तड लावण्यासाठी पुढील दिशा ठरविण्यासाठी, समाजातील सर्व घटकांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने या संवाद यात्रेचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर ही सवांद यात्रा पुढे मार्गस्थ झाली.

  • समाजबांधव असंतोषाने पेटून झाला भावनिक
    मराठा बांधवांनी या मराठा संवाद यात्रेत सहभाग घ्यावा. मराठा आरक्षणाच्या निर्णयास उशीर होत असल्यामुळे समाजबांधव आता असंतोषाने पेटून भावनिक झाला आहे. मनोबल वाढविण्याचे काम या मोर्चातून करण्यात येत आहे. वैचारिक चिंतनातून सामाजिक एकोपा टिकविण्यासाठी आणि जातीजातीतील द्वेष वाढू नये यासाठी समाजबांधव, विचारवंत प्रसारमाध्यमे यांच्याशी संवाद साधून समाजाच्या उत्कर्षासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे समाजाच्यावतीने सांगण्यात आले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)