मराठा समाजाचा “अकोले बंद’ शांततेत

अकोले – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज अकोले शहर व अकोले तालुका बंद शांततेत पार पडला. निषेध फेरी काढून व टायर जाळून या आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात प्रारंभी आ. वैभवराव पिचड सहभागी झाले होते, तर अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवल्याने अकोले बंदला पूरक वातावरण बनले.

आज सकाळी नऊ वाजता राष्ट्रगीत म्हणून तालुक्‍याच्या पूर्व भागातील मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या गावांनी गाव बंद आंदोलन सुरू केले. सर्व व्यवहार बंद झाल्यानंतर आंदोलक तालुक्‍याच्या गावी आले आणि घोषणाबाजी करीत सर्व आंदोलक अकोले येथे एकत्र आले. हातात भगवे झेंडे धरून गावातून या आंदोलकांनी निषेध मोर्चा काढला. “एक मराठा, लाख मराठा,’ “जय जिजाऊ, जय शिवराय,’ “आरक्षण नाही जमणार नाय,’ “आरक्षण आमच्या हक्काचे,’ “नाही कुणाच्या बापाचे,’ या व अन्य घोषणा देत हे सर्व आंदोलक निषेध मोर्चा काढून अकोले शहरातून फेरीने अकोले बस स्थानकावर आले. या निषेध मोर्चात आ. पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे आदींचा यात सहभाग होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बसस्थानकासमोर सर्वांनी बैठा सत्याग्रह सुरू केल्याने अनायासे “रास्ता रोको’ झाला. या वेळी मराठा सकल समाजाचे राज्याचे निमंत्रक डॉ. संदीप कडलग यांनी, “आरक्षण नाही, तर यापुढील आंदोलन अटळ ठरेल,’ असा इशारा दिला. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी, “मराठा समाजातील तरुण वैफल्यग्रस्त झाला आहे. त्याच्या डोक्‍यात व डोळ्यात अंगार आहे,’ असे निदर्शनास आणून दिले. या वेळी शेतकरी नेते दशरथ सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष लालूशेठ दळवी, मराठा महासंघाचे व संभाजी ब्रिगेडचे दिलीप शेणकर, मनसेचे संजय वाकचौरे, भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष विजयराव वाकचौरे, भाजपच्या नगरसेवक सोनाली नाईकवाडी, अगस्तीचे संचालक सुरेश गडाख, नगरसेवक प्रमोद मंडलिक, कॉंग्रेसचे आरिफ तांबोळी, निखील जगताप आदींनी सरकारवर सडकून टीका केली.

एकनाथ चौधरी, डॉ. मनोज मोरे, विकास शेटे, नामदेव गोडे, तनुजा घोलप, आश्विनी काळे,शाहीर मुकुंद भोर, प्रदीप हासे, विलास आरोटे आदींची या वेळी भाषणे झाली. या सभेनंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार मनोज कांबळे यांना दिले. आंदोलन सुरू असताना कोल्हार-घोटी रस्त्यावर काही उत्साही कार्यकर्त्यांनी टायर जाळले. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाडीने तातडीने हे टायर विझवले.

सरकारविरोधात ठोकल्या बोंबा

या सर्व आंदोलनाचे चित्रीकरण “ड्रोन’द्वारे करण्यात आले. या वेळी तरुण व तरुणींनी गाणी गायली. सरकारविरुद्ध बोंबा ठोकून आंदोलन पेटवले. विशेष बाब म्हणजे हे आंदोलन सर्वपक्षीय झाले. मुस्लीम समाजाचा त्यात लक्षणीय सहभाग राहिला; मात्र या वेळी पर्यायी मार्ग शोधून प्रवाशांनी प्रवास सुरू ठेवला. सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्याने शैक्षणिक व वित्तीय संस्था बंद असल्याने “अकोले बंद’ला पोषक वातावरण राहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)