मराठा विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पहिले वसतीगृह कोल्हापूरात

कोल्हापूर – राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्यावतीने सुसज्ज वसतीगृहे उभारण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूरात राज्यातील पहिले मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्यात आले आहे. या वसतीगृहाची महसूलमंत्री तथा कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पाहणी केली. येत्या 26 जुलै पर्यंत या वसतीगृहामध्ये मुलं प्रत्यक्षपणे राहण्यास येतील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सदर बाजार येथील शाहू कॉलेज शेजारी असलेल्या शासकीय निवासस्थान इमारतीची दुरुस्ती करुन अद्ययावत वसतिगृह इमारत तयार करण्यात आली आहे. त्या इमारतीत मराठा समाजातील 72 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होणार आहे. या परिसरातील उर्वरित सर्व निवासस्थानाच्या इमारतींची तात्काळ दुरुस्ती करुन ती निवासस्थाने शासकीय अधिकारी, कर्मचऱ्यांना देण्यात यावीत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा, त्यास तात्काळ मान्यता दिली जाईल. या वसतीगृहाच्या इमारतीचा परिसर स्वच्छ करणे, परिसर व वसतिगृह इमारतीमध्ये सीसीटीव्ही, गिझर, सोलर, सुरक्षा याबरोबरच परिसरात वृक्षारोपण याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह अधिकारी आणि काही मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निम्मी फी शासन भरणार
कोल्हापुरातील विकसित करण्यात आलेले मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीचे राज्यातील हे पहिले वसतीगृह आदर्शवतच करण्याचा मानस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निम्मी शैक्षणिक फी शासनामार्फत भरली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांसाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सारथी ही संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था बार्टीच्या धर्तीवर आजपासून सुरु करण्यात येत आहे. या संस्थेमार्फत मराठा समाजातील तरुणांना प्रशिक्षण देण्याबरोबरच रुढी, परंपरांचा अभ्यास तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जगभरातील देशात शिक्षणासाठी जाता यावे यासाठी फेलोशिप याबाबी प्रामुख्याने राबविल्या जाणार आहेत. या सारथी संस्थेचं केंद्र कोल्हापुरातही निर्माण करण्याचा पाठपुरावा करु, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)