पिंपरी – मराठा मोर्चाच्या आंदोलनांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. परंतु, समाजाचे प्रतिनिधी म्हणून जे समन्वयक काम पाहत आहेत. त्यामध्ये महिलांचा समावेश करून घेण्यात आला नाही. आता राज्यभरातून सकल मराठा महिला क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य या महिलांच्या क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून महिलांचे राज्यव्यापी संघटन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या पुणे प्रतिनिधी उषा पाटील यांनी दिली.

पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी स्वाती पवार, अर्चना काकडे, ज्योती सपाटे, मीरा ढोके, संगिता कोरे, सलोनी भोसले, मीना पावडे, शकुंतला भोसले, स्वाती पवार आदी उपस्थित होते.

उषा पाटील म्हणाल्या, सकल मराठा समाजाने मराठा 58 मूक मोर्चे काढले. यानंतर ठोक मोर्चे देखील काढले. क्रांती दिनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आले. तरी ही मराठा समाजाच्या पदरात काहीच पडले नाही. या सर्व आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. एवढे असूनही महिलांना राज्यस्तरीय समितीत स्थान दिले नाही. महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेऊन 50 टक्के जागा समितीमध्ये द्यायला पाहिजे. असे न झाल्यास मराठा समाजातील महिला सकल मराठा महिला क्रांती मोर्चाद्वारे राज्यभर मोठे संघटन केल्याशिवाय थांबणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या वतीने महिलांचे राज्यव्यापी संघटन उभारण्यात येणार आहे. यासाठी पहिली बैठक पुण्यात झाली. यावेळी राज्यातील 22 जिल्ह्यामधील 100 महिला उपस्थित होत्या. येत्या 11 सप्टेंबरला नांदेड येथे जिल्हा बैठक होणार आहे. याप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत व शहरांत या महिन्यात बैठका घेऊन समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. आगामी सर्व आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग, महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)