मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण मागे 

संग्रहित छायाचित्र

-जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची शिष्टाई फळाला 
-हिवाळी अधिवेशनापर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे अल्टिमेटम 

मुंबई –
मराठा आरक्षणासारठी आझाद मैदानावर 16 दिवसांपासून सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण आज अखेर मागे घेण्यात आले आहे. यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाई करत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. मात्र, सरकारला आगामी अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा इशाराही आंदोलकांचे नेते संभाजी पाटील यांनी दिला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2 नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसले होते. दोन दिवसांपूर्वी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही या आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या आंदोलकांशी चर्चा केली होती. तसेच आज सकाळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली होती.

-Ads-

त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलकांशी चर्चा करुन सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती दिली. बहुतांश मागण्या या पूर्ण झाल्या असून लवकरच मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांचे नेते संभाजी पाटील यांनी उपोषण सोडताना सरकारला इशारा दिला की गेल्या 16 दिवसांपासून सुरु असलेले उपोषण काळात आंदोलक पाणी तरी पित होते. मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पाणी न पिता उपोषण आंदोलन करण्यात येईल.

दरम्यान, मराठा क्रांती आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आरक्षणासोबतच कोपर्डीच्या गुन्हेगारांना सुनावलेल्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलन काळात आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत आणि सरकारी नोकरी तसेच ऍट्रासिटी कायद्यात दुरुस्ती या मागण्या आहेत.

आंदोलकांनी सरकारला आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे अल्टिमेटम दिले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्रालय तसेच मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थान आणि आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)