मराठा आरक्षण विधेयक गुरुवारी विधिमंडळात आणणार 

संग्रहित छायाचित्र

– आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक
मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडावा, या मागणीसाठी विरोधकांनी गेल्या आठवड्यापासून कामकाज रोखून धरले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येत्या 29 नोव्हेंबर रोजी विधानसभेत आरक्षणाचा कायदा करण्यासाठी विधेयक मांडणार असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने स्थापन केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत विधेयकाच्या प्रारुपावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. यात 29 नोव्हेंबर रोजी विधेयक विधानसभेत मांडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच दिवशी विधानसभेत विधेयक संमत करून ते मंजूरीसाठी विधानपरिषदेत पाठवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

-Ads-

30 नोव्हेंबर रोजी अधिवेशन संपत असल्याने 29 नोव्हेंबर रोजीच विधानपरिषदेतही हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.सरकार राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर कृती अहवाल (एटीआर) मांडणार आहे. सरकारने अहवालावर काय कार्यवाही केली. शिफारशी तत्वतः मान्य केल्या की फेटाळल्या याची माहिती सरकार देईल. आयोगाने दिलेल्या तीन शिफारशी स्वीकारून सरकार आरक्षण विधेयक मंजुरीसाठी मांडेल.

विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाले आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा तसेच धनगर आरक्षणाबाबत “टीस’चा अहवाल मांडल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे गेल्या आठवड्यापासून नियमित कामकाज देखील होउ शकलेले नाही. विरोधकांची ही आक्रमक भूमिका लक्षात घेऊन आता सरकारकडून विरोधकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवली आहे. आरक्षणासंदर्भात सरकार काय करतेय याची माहिती या बैठकीत सरकारतर्फे विरोधकांना दिली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)