मराठा आरक्षणासाठी राज्यभर “जेलभरो’

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आधी मूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि आता जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबईतल्या आझाद मैदानावर 11 वाजल्यापासून सार्वत्रिक जेलभरो आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनातील 34 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे नाशिक, ठाणे, परभणी, नंदुरबार आदी ठिकाणीही मराठा मोर्चाकडून जेलभरो करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाशिकमधील मालेगाव येथील शिवाजी पुतळ्याजवळ आज सकाळी शेकडो आंदोलकांनी एकत्र जमून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली करत अटक करवून घेतली. लातूरमध्ये आंदोलकांनी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर जमून ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मराठा आमदारांविरोधात आणि सरकारविरोधात जोरजोरात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

जेलभरो सुरू असतानाच मराठा आंदोलकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला. शेकडो आंदोलकांनी या महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर सोलापूर, पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, लातूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, काही दिवसांपासून आंदोलनाप्रसंगी पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाची माफी मागावी, समाजासाठी प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी 50 लाख रुपये व जखमींना 10 लाख रुपये देण्यात यावेत. कळंबोली येथे महिलांवर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करत त्यांना त्वरीत निलंबित करावे, अशा मागण्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)