मराठा आरक्षणासाठी आडते असोसिएशन आणि कामगार युनियनची दुसऱ्यांदा मार्केट यार्ड बंदची हाक

गुरूवारी पाळणार बंद : यापूर्वी 30 जुलै रोजीही पाळला होता बंद

पुणे- सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठींबा देत श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनच्या वतीने दुसऱ्यांचा मार्केट यार्ड बंदचे आवाहन केले आहे. यापूर्वी 30 जुलै रोजी दोन्ही संघटनांनी बंद पुकारला होता. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाला होता. आता पुन्हा गुरूवारी (दि. 9 ऑगस्ट) दोन्ही संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मागील अनेक दिवसांपासून राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनची संयुक्तीक बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाची आरक्षणाची मागणी राज्य सरकारने त्वरित मंजुर करावी, यासाठी पुन्हा बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले, सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. त्यासाठी आवश्‍यक ती प्रक्रीया पूर्ण करावी. मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या गुरूवारी दुसऱ्यांदा बंदचे आवाहन केले आहे. त्यानुसार या बंदमध्ये फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, पान, केळी विभागातील सर्व व्यापारी सहभागी होणार आहेत. म्हणजेच मार्केट यार्द बंद असणार आहे. कामगार युनियचे सचिव संतोष नांगरे म्हणाले,गुरूवारी सकाळी 10.30 वाजता मराठा आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून मार्केट यार्डातील शिवाजी पुतळ्यापर्यंत शांततेने मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून मोर्चाची समाप्ती होणार आहे. सोमवारी दोन्ही संघटनांच्या झालेल्या बैठकीस आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, ज्येष्ठ आडते गणेश घुले, युवराज काची, रोहन उरसळ, राजेंद्र कोरपे, कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण, सचिव संतोष नांगरे, खजिनदार विलास थोपटे, सुर्यंकांत चिंचवले, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, नितीन जामगे, भरत शेळके तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, राजेश मोहोळ, विशाल केकाणे, महात्मा फुले कामगार संघटनेचे अंकुश हारपुडे, किसन काळे, किसन कानगुडे महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे संपत धोंडे, बाळासाहेब कांदे, आबु जाधव, टेम्पो पंचायतचे गणेश जाधव, सुरेश ठक्कर, सुरेश सातपुते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)