मराठा आरक्षणावर प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया

युती शासनाचा ऐतिहासिक निर्णय
महाराष्ट्रातील मराठा समाजाला 16 टक्के दिलेले आरक्षण हा युती शासनाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे सकल मराठा समाजाला न्याय मिळाला असून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकेल आणि तेही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही, असे आरक्षण युतीच्या शासनाने मिळवून दिले, याचा खुप आनंद वाटतो. आरक्षणाच्या मागणीकरीता संपुर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्‍याच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आंदोलने करण्यात आली. मोर्चे काढण्यात आले. त्याची दखल घेत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीत टिकेल आणि इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का पोहचणार नाही, असा कायदा विधीमंडळाच्या याच अधिवेशनात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार आज तो एकमताने मंजूर देखील करण्यात आला. या निर्णयाबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या वतीने युतीच्या शासनाचे आभार मानतो.
– आ. शंभूराज देसाई, पाटण मतदार विधानसभा संघ

40 लोकांच्या बलिदानामुळे आरक्षण
मराठा समाजाने जगात होणार नाहीत असे मोर्चे काढले. त्यामुळे तसेच मराठा समाजातील 40 लोकांच्या बलिदानामुळे समाजाला आरक्षण मिळाले आहे. खरे तर आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र दुर्दैवाने ते न्यायालयात टिकले नाही. मराठा समाजातील अनेक गरजु व गुणवंत लोकांना आरक्षण मिळणे गरजेचे होते.मराठा समाजातील तरूणांना शिक्षणात, नोकरीत आरक्षण मिळाल्याने नक्कीच उन्नती होण्यास मदत होईल. आरक्षणाचा जल्लोष कोणत्या राजकीय पक्षाने करण्याची गरज नाही. कारण तो अधिकार त्यांना नाही. मिळालेले आरक्षण हे मराठा समाजाच्या एकीने अन्‌ 40 जणांच्या बलीदानामुळे मिळाले आहे.
– आ.जयकुमार गोरे, माण विधानसभा

-Ads-

मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय
मराठा समाजाला आलेले देण्यात आलेले आरक्षण हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय म्हणावा लागेल. महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने जे मोर्चे निघाले आणि राणे समितीचा अहवाल व या संदर्भात झालेल्या वाटाघाटींमुळे सरकारवर दबावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही पण विरोधाची धार तेज केली होती. सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा आरक्षणामध्ये कोणतेही राजकारण न करता या विधेयकाला एकमुखी पाठिंबा देण्यात आला. मराठा समाजाला स्वतंत्रपणे सोळा टक्के आरक्षण मिळणे हा निर्णय निश्‍चितच महत्वपूर्ण आहे. सरकारने आता जवाबदारीने हे आरक्षणं कोर्टात कसे टिकेल हे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आंदोलनात ज्यांचा बळी गेला त्यांना नुकसानभरपाई व ज्यां तरूणांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे हा राष्ट्रवादीचा आग्रह राहणार आहे.
आ. शशिकांत शिंदे, (कोरेगाव )

मराठा समाजाला फायदा होईल
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय ऐतिहासिक असून मी सरकारचे अभिनंदन करतो. या निर्णयाचा फायदा मराठा समाजातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार आहे. हे आरक्षण कायदेशीर टिकण्याची गरज आहे.
– आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा.

स्व.अण्णासाहेबांच्या बलिदानाचे सार्थक झाले
आज मराठा क्रांती मोर्चाला शासनाने पाठिंबा देत, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्यदैवत मराठा समाजाचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानाचे सार्थक झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाचे आरक्षण जाहीर केल्याने अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानाचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखे वाटत आहे.
– नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष, अ.पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या.

मराठा समाजाबरोबर मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन
मराठा आरक्षण हे बलिदान दिलेल्या लोकांना अर्पण आहेच. पण कायद्याच्या कचाट्यात टिकेल असे आरक्षण मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे त्यांचेही अभिनंदन करायलाव हवे. आजवर नव्वद टक्के मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. तरीही त्यांनी समाजाच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले. आघाडी सरकारने मराठा समाजाला वेळेत आरक्षण दिले असते, तर ज्या लोकांचा जीव गेला तो नक्कीच वाचला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंढरपूरच्या पुजेसाठी जाण्यास विरोध केला होता. तरीही त्यांनी कोणताही राग मनात न धरता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. आजवर मराठा समाजाचा वापर करणाऱ्यांनी विधानसभेत कधीही तोंड उघडले नाही. आरक्षण या मुद्यावर भाजपाबद्दल बोलण्याची त्यांची पात्रता नाही.
– डॉ.दिलीप येळगांवकर, माजी आमदार

आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे योगदान
मराठा समाजाला आरक्षण मिळाले हा चांगला निर्णय झालेला आहे. या आरक्षणासाठी सर्वपक्षीय योगदान आहे. आघाडी शासनाने यापूर्वीच मराठा समाजास आरक्षण देण्याचे जाहीर करुन त्या दृष्टीने पाऊले उचलली होती. परंतु, या सरकारने दोन वर्षे कोर्टात म्हणणे न दिल्याने या आरक्षणला उशीर झाला. मराठा समाजाने उभारलेल्या मोठ्या आंदोलनामुळे सरकारने हे आरक्षण दिले आहे. या साठी सर्वांचेच योगदान आहे.
– आ. दीपक चव्हाण, फलटण

What is your reaction?
76 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)