मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष

मान्यवरांकडून समाधान व्यक्त : सर्वच राजकीय पक्षांचे अभिनंदन

सातारा 
– राज्यात मराठा आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राजधानी साताऱ्यात एकच जल्लोष करण्यात आला.मान्यवरांकडून समाधान व्यक्त करण्यात येउन सर्वच राजकीय पक्षांचे अभिनंदन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक शरद काटकर, हरीष पाटणे म्हणाले, कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर मराठा समाज एकत्र आला. मराठा आरक्षण हा विषय गेल्या दिड वर्षापासून जिव्हाळयाचा बनला होता. मराठा एकसंघ झाला. हे कोणत्याही राजकीय पक्षाला न परवडणारे होते. मराठा आरक्षण हे दोन पाच हजार लोकांनी मोर्चे काढून सुटणारा प्रश्‍न नव्हता.

आरक्षणाच्या महत्वाच्या प्रश्‍नासाठी दुर्गम डोंगराळ भागातील ग्रामीण भागातील बळीराजासह शहरातील मराठा बांधवांनी एकीची वज्रमुठ बांधल्यामुळे लाखो शिस्तप्रिय व शांततेचे मोर्चे निघाले. नाविलाजाने सरकारला आरक्षणाबाबत सकारात्मक भुमिका घ्यावी लागली. आज विधेयक मंजूर झाले. भाजप-सेनेचेच्या सरकारला राष्ट्रवादी, कॉंग्रेस, आरपीआय, शेकाप आदी घटक राजकीय पक्षांनी एकमुखी पाठींबा दिला. त्याबद्दल सर्वच राजकीय पक्षाचे मराठा समाजातील तमाम बांधवाच्यावतीने अभिनंदन करीत आहोत.

मराठा समाजाने आर्धी लढाई जिंकली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विधीमंडळ सदस्यांचे अभिनंदन. हे आरक्षण निवडणुकीपुरते नसून सर्वोच्च न्यायालयातही टिकले पाहीजे.यासाठी ज्यांनी सहकार्य केले. त्या सर्वांचे राष्ट्रवादी सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आभार मानतो, अशी प्रतिक्रीया हैद्राबाद येथून सुनिल माने यांनी दिली.

फळ विक्रेते बळीराम जाधव यांनी सांगीतले की, मराठा समाज हा आमचा थोरला भाऊ असून संविधानानुसार त्यांना न्यायालय आरक्षण देईल यासाठी सत्य परिस्थिती मांडणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका मांडली, ती आज पूर्ण झाल्याचे समाधान वाटते.

शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव म्हणाले,मराठा समाजाचा लढा यशस्वी झालेला आहे. सध्या मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मराठा समाजासोबतही धनगर समाजालाही आरक्षण मिळावे ही शिवसेनेची भुमिका आहे. न्यायालयात निश्‍चितच यश मिळेल. या लढ्यामध्ये सातारा जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. कारण छत्रपतींच्या राजधानीत 3 आक्‍टोंबर रोजी निघालेल्या मोर्चाच्या वेळीच भाजप सरकारला आरक्षणाशिवाय पर्याय राहिला नाही.

रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले,महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या 32 टक्के आहे. त्याचे निम्मे आरक्षण महाराष्ट्र विधीमंडळात मिळविण्यासाठी सर्वच आमदारांनी एकजूट दाखवली. रिपब्लीकन पक्षाने सातार्यात यासाठी जनजागृती रॅली काढली. व मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याचे मनस्वी आनंद वाटत आहे.

भाजपचे दत्ताजी थोरात म्हणाले,भाजप हा सर्व जाती-धर्माचा पक्ष आहे. आम्ही मराठा समाजातील लोक भाजपचे काम करीत आहे. आम्ही कधीही पक्ष बदलला नाही. उलट मराठा आरक्षणासाठी भाजप नेत्यांनी आमच्यावर विश्‍वास दाखवला. याचे समाधान वाटत आहे. याचे श्रेय फक्त रस्त्यावर उतरणार्या सर्व जाती-धर्मातील बांधवांचे आहे. आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. न्यायालयातही यश मिळेल याची आम्हा खात्री वाटत आहे.

कॉंग्रेसचे रविंद्र झुटींग म्हणाले, पुर्वी मराठा समाजाची परस्थिती सधन होती. पण वाढती महागाई विभक्त कुटूंब पध्दती व शिक्षणाचा अभाव या गोष्टींमुळे आता मराठा समाजही आरक्षणाचा हक्कदार बनला आहे. हे सरकारच्या लक्षात आले आहे. कॉंग्रेस पक्षाने विधिमंडळात हा प्रश्‍न लावून धरला आहे. त्याला यश मिळाले आहे.

शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे म्हणाले,महाराष्ट्रात सर्वाधिक मराठा समाजातील शेतकर्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. एकेकाळी बांधावर बसून आपली बागायत शेती पहाणारे मराठा बांधव आज राज्य कर्त्यांच्या चुकीमुळे माथाडी म्हणून शहरात जावून हमाला करीत आहेत. आरक्षणामुळे किमान सुशिक्षित मराठा समाजाला प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन.

किशोरभाऊ तपासे म्हणाले, रिपब्लीकन पक्षाने पहिल्या पासूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भुमिका मांडली होती. त्याला यश मिळाले आहे. अर्थात यासाठी मराठा समाज रस्त्यावर आला. मराठा किंवा इतर हिंदु यांनी या मागणीला जोर लावला. पण काही संघटना मात्र यात सामिल झाल्या नाहीत. तरीही त्यांचेही स्वागत करीत आहोत.

मुस्लीम समाजातील युवा नेते फिरोज पठाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विक्रमी मोर्चे निघाले. या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाने मराठा समाजासाठी चहा पान व्यवस्था करून आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश दिला. आज माझ्या मराठा मित्रांनी विधिमंडळातील कामगिरीनंतर मला मिठी मारून जे स्वागत केले, त्यामुळे मराठा मुस्लिम बांधव एकच आहे, हे छत्रपतींच्या राजधानीने दाखवून दिले आहे. आता इतर समाजालाही आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी मी इबादत करतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)