मराठा आरक्षणप्रश्‍नी विशेष अधिवेशन बोलावणार

फलटण : मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलनस्थळी मार्गदर्शन करताना ना. रामराजे शेजारी मान्यवर.

ना. रामराजे : आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन

फलटण, दि. 3 (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणप्रश्‍नी तुमचा आवाज शासनापर्यंत पोहोचला असून विशेष अधिवेशन बोलवणार आहे. यातून मार्ग निघेल. त्यासाठी थोडा अवधी देण्याची आणि आंदोलन आताप्रमाणे शांततेच्या मार्गाने चालवण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.
मराठा क्रांती मोर्चाचेवतीने दि. 24 रोजी फलटण बंद यशस्वी केल्यानंतर दि. 26 पासून येथील अधिकारगृह इमारतीसमोर गेले 8 दिवस ठिय्या आंदोलन सुरु आहे. याठिकाणी ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी रामराजे म्हणाले, आरक्षणप्रश्‍नी मराठा समाजाने केलेली आंदोलने, शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले आहेत. त्याची शासनाकडेही नोंद आहे. शासनावर दबाव आणल्यामुळे शासन आरक्षण देण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र, कायदेशीर बाबी, घटनेतील तरतुदी याचा विचार करुनच आरक्षणाचा निर्णय घेणे उचित ठरेल. अन्यथा पुन्हा न्यायालयात प्रश्‍न गुंतला जावू शकतो. यावेळी दि. 9 ऑगस्टच्या क्रांती दिनानंतरही आंदोलन वेगळ्या मार्गाने न नेता संयम आणि शांततेने आंदोलन चालवणेच हिताचे असल्याने शांतता आणि संयम ढळू देवू नका असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातून आंदोलनप्रश्‍नी चर्चा करण्यासाठी एक-दोन व्यक्तींची नावे निश्‍चित करण्याची गरज आहे. शासन या प्रश्‍नी सकारात्मक असल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी सुभाषराव शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाचेवतीने ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, जयकुमार शिंदे, अमोल सस्ते, माऊली सावंत, डॉ. जे.टी.पोळ यांनीही मनोगत व्यक्त केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)