मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या 

विदर्भात 18 वर्षांत 15 हजार, तर मराठवाड्यात 9 महिन्यांत आत्महत्येच्या 674 घटना 

मुंबई: आस्मानी संकटामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला असतानाच नापिकी आणि कर्जाचा बोझा असह्य झाल्याने मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जानेवारी 2001 ते ऑक्‍टोबर 2018 या 18 वर्षांत विदर्भातील सुमारे 15 हजार 629 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर मराठवाड्यात जानेवारी 2018 ते सप्टेंबर 2018 पर्यंत 674 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली आहे.

नापिकी, बोंडअळीमुळे पिकांचे झालेले नुकसान, दुष्काळी परिस्थिती व शेतमालांला मिळणारा अनिश्‍चित दर आदी विविध कारणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आत्महत्येची आकडेवारी दिली आहे. राज्यात विविध कारणांमुळे सप्टेंबर 2018 या एका महिन्यात एकूण 235 आत्महत्यांची प्रकरणे निदर्शनास आली असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुुंबियांना आर्थिक मदत देण्यास अपात्र ठरलेली प्रकरणे पात्र करण्यासाठी नियमावलीत शिथीलता आणण्याची कोणतीही बाब सरकारच्या विचारधीन नसल्याचे सांगत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

विदर्भातील 8406 प्रकरणे ठरली अपात्र 

विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये जानेवारी 2001 ते ऑक्‍टोबर 2018 पर्यंत विविध कारणांमुळे 15 हजार 629 आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी 7008 प्रकरणे निकषामध्ये पात्र ठरली असून 8406 प्रकरणे अपात्र ठरविली आहेत. 215 प्रकरणे चौकशीमुळे प्रलंबित असून पाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रूपयांची आर्थिक मदत केल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. मराठवाड्यात आत्महत्याग्रस्त 674 शेतकऱ्यांपैकी 445 प्रकरणे पात्र ठरली. नाशिक जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 73 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी 17 प्रकरणे पात्र ठरली असून त्यांना प्रत्येकी 1 लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरमध्ये 2004 ते जून 2018 या कालावधीमध्ये 113 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)