मराठवाडा, विदर्भात पावसाचे धूमशान

संग्रहित छायाचित्र

अनेक गावांत पूरस्थिती : उत्तर महाराष्ट्रालाही झोडपले

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 18 – राज्यातील विविध भागांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे अनेक गावांना पुराने वेढले असून खरीप पिकांनाही फटका बसला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची संततधार सुरू आहे.

र्यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती नदीचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील तब्बल एक हजारांवर लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या तालुक्‍यात सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्याचबरोबर दिग्रस तालुक्‍यात विठाळी वरंदळीमध्ये पुराच्या पाण्यामुळे घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले.
उत्तर महाराष्ट्रालादेखील पावसाने झोडपून काढले आहे. नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात अतिपावसामुळे बंधारा फुटला असून आजूबाजूच्या तीन ते चार गावांमध्ये पाणी शिरल्याने पशूधन मृत्यमुखी पडले, तर नाल्याला मोठा पूर आला आहे. त्याचबरोबर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे इसापूर, विष्णुपुरी, निम्न मनार प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पांचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. अनेक तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. पूर्णा, दुधना, पैनगंगा, गोदावरी या प्रमुख नद्यांसह ओढे, नाल्यांना पूर आला आहे.

कोयना धरणातून विसर्ग सुरूच
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून सुमारे 50 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठाच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी धरणाचे सुद्धा चार दरवाजे उघडण्यात आल्याने पंचगंगेला पूर आला आहे. तेथेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाचा जोर कायम राहणार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने शुक्रवारी राज्यातील अनेक भागातील पावसाचा जोर ओसरला होता. पण अरबी समुद्रात पुन्हा एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्यामुळे रविवारी कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात आणखी एक क्षेत्र निर्माण होत आहे. हे क्षेत्र सक्रिय झाल्यावर सोमवारपासून विदर्भ तसेच मराठवाड्यात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील आठवडा पावसाचाच राहण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)