मरणासन्न नद्यांचे अश्रू दिसतील का?

संग्रहित छायाचित्र

भारतीय नदी दिनविशेष


शासकीय उपाय आणि योजना कागदावरच


राज्यात प्रदूषित नद्यांची संख्या 49 वरून 53 वर


प्रशासनकडून फक्‍त नोटीस पाठविण्याचे सोपस्कार

पुणे – नदी सुधारणेबाबत गाजावाजा करत घोषणा केल्यानंतरही गेल्या चार वर्षांत एकट्या पुण्यातील मुळा, मुठा नदीच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. याऊलट तिच्या दुरवस्थेत वाढ होत असल्याचे विविध शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यासातून समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर राज्यातील प्रदूषित नद्यांची संख्या 49 वरून वाढून 53 झाल्याचे राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने अधिवेशनात नुकतचे सांगितले आहे. त्यामुळे नदी सुधारणा फक्‍त “इव्हेंट’च राहू नये, अशी नागरिकांची भावना आहे.

देशातील नद्यांची स्थिती सुधारण्याबाबत केल्या जाणाऱ्या कार्याला प्रेरणा मिळावी, यासाठी 2015 पासून 28 नोव्हेंबर रोजी भारतीय नदी दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने नदी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, सातत्याने प्रयत्न करूनही नद्यांची परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच बिकट होत असल्याचे दिसत आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पाहणीनुसार राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये मुंबई येथील मिठी नदी, पुण्यातील मुळा-मुठा आणि भीमा नदी यांचा समावेश आहे. या नद्यांची स्वच्छता आणि सुधारणेबाबत अजूनही कोणत्याही ठोस उपाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. इतकेच नव्हे, तर प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नद्यांच्या पाण्याचे नमुने तपासले जातात. परंतु त्यांचे प्रदूषण करणाऱ्या घटकांना नोटीस देण्याव्यतिरिक्त अजून कोणतीही कारवाई केली नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे यांनी सांगितले आहे.

त्यामुळे नदी स्वच्छतेबाबतचा गाजावा हा केवळ दिखाऊपणा आहे की काय? त्याबाबतच्या उपाययोजना या कागदी योजना आहेत, की काय? अशी शंका निर्माण होत आहे.

ऑक्‍सिजनअभावी मुळा-मुठा धोक्‍यात
नदीत मिसळणारे सांडपाणी, राडारोडा, कचरा, रसायनमिश्रित द्रव्ये या सर्वांमुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. विशेषत: होळी आणि गणेशोत्सव काळात या प्रदूषणाचे प्रमाण जास्त असते. जीवितनदी या नदीविषयी कार्य करणाऱ्या संस्थेकडून नदीच्या पाण्याची सातत्याने तपासणी केली जाते. संस्थेने नुकत्याच केलेल्या चाचणीत नदीतील ऑक्‍सिजनचे प्रमाण शून्य असल्याचे समोर आले आहे. यामुळे नदी मरणासन्न अवस्थेत पोहचल्याचे निष्पन्न झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)