ममता बॅनर्जीना पूर्वी बांगलादेशींना हाकलायचे होते……

नवी दिल्ली – ममता बॅनर्जीना पूर्वी बांगलादेशींना भारतातून हाकलायचे होते. त्यासाठी लोकसभेत बोलण्याची परवानगी न दिल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामाही दिला होता. मात्र आसममधील बांगला देशींचा कैवार घेऊन, त्यांना घालवल्यास देशात यादवी युद्ध होईल, रक्तपात होईल अशा धमक्‍या देणाऱ्या तृणमूल कॉंग्रेस अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे बांगला देशींबाबतचे विचार पूर्वी अगदी विरुद्ध होते. त्यांचा हा यू टर्न राजधानीत चर्चेचा विषय ठरला असून कॉंग्रेसनेही त्यांच्यापासून या विषयावर लांब राहणेच पसंत केले आहे.

बंगालमध्ये बांगला देशी घूसखोरांची समस्या बिकट झाली आहे. मतदार यादीतही बांगला देशींची नावे समाविष्ट झालेली आहेत या विषयावर 4 ऑगस्ट 2005 रोजी ममता बॅनर्जी यांना लोकसभेत बोलायचे होते. बोलण्याची परवानगी नाकारली म्हणून संतप्त ममता बॅनर्जी यांनी लोकसभेचे उपाध्यक्ष चरणजीत सिंह अटवाल यांच्याजवळ जाऊन त्यांच्या अंगावर कागद फाडून भिरकावले होते. त्यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित झाले होते.

-Ads-

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीबद्दल त्यांच्याकडून माफीनाम्याची मागणी केली होती. ममता बॅनर्जी यांनी बोलायला न दिल्याबद्दल नंतर राजीनामा दिला होता.
पुढे भाजपाचे ज्येष्ठ नेत लालकृष्ण आडवाणी यांनी ममता बॅनर्जींचा बचाव करत अध्यक्षांच्या कक्षात प्रकरण मिटवले होते. त्याच ममता बॅनर्जी आसाममधील बांगला देशींची कैवार घेत रक्तपात आणि यादवी युद्धाची भाषा करत आहेत यावरून त्यांच्या विचारांनी कोलांटी उडी मारल्याचे दिसून येत आहे.

व्यापक राष्ट्रीय हिताच्या मुद्दयावर तरी राजकीय पक्षांनी एका सुरात बोलण्याचे संकेत असतात. ती प्रथा आपल्याकडे आतापर्यंत पाळली गेली आहे. त्यामुळेच आसाममधील नागरिकांच्या नोंदणीच्या मद्दयावर कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने बेधडक आणि बेजबाबदार विधान न करण्याचा समंजसपणा आतापर्यंत दाखवला आहे.

मात्र ममता बॅनर्जी यांच्या एकुणच राजकारणाचा पोतच वेगळा आहे. मुद्दयावरून गुद्यावर येणाऱ्या ममता काहीशा आक्रस्ताळेपणाकडे झुकलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. तथापी, आताच्या या विषयावर त्यांनी अशी टोकाची भूमीका घेत बेजबाबदार विधाने करताना आपल्याच पूर्वीच्या भूमीकेचेही स्मरण ठेवलेले बरे राहील, असे बोलले जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)