नीलांबरी जोशी : “साहित्य आणि चित्रपटांमध्ये डोकावणारे मनोविकार’वर व्याख्यान
पुणे – मनोरुग्ण म्हणजे, दाढी, केस वाढलेले, फाटके कपडे, हिंसक अथवा आक्रमक वागणूक अशी नकारात्मक व्यक्तीरेखा चित्रपट आणि साहित्यातून दाखविली जाते. अशा प्रतिमांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मनोरुग्णांबद्दल भीती, तिरस्कार निर्माण होतो. यामुळे समाजमनात मनोरुग्णांची वाईट प्रतिमा निर्माण करण्यात माध्यमांची मोठी भूमिका आहे, असे मत लेखिका नीलांबरी जोशी यांनी शनिवारी व्यक्त केले.
हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्सिट्यूटतर्फे “साहित्य आणि चित्रपटांमध्ये डोकावणारे मनोविकार’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेच्या अध्यक्षा इला कांबळी, सचिव राजेंद्र बहाळकर उपस्थित होते.
जोशी म्हणाल्या, अलीकडील काळात आर्थिक विषमता, जीवनशैलीच्या अपेक्षा अशा विविध कारणांमुळे मनोविकाराचे प्रमाण वाढले आहे. इतकेच नव्हे तर येत्या काळात शारीरिक विकारांपेक्षा मनोविकारामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या वाढेल, असे भाकित जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविले आहे. माध्यमांमुळे असे मनोविकार वाढण्यात भर पडत आहे. एकीकडे “झीरो फिगर’, आकर्षक सौंदर्य यांसारख्या गोष्टींचे आकर्षण तर दुसरीकडे “जंकफूड, तेलकट पदार्थ खा’ असे सांगणाऱ्या जाहिरातींचा भडिमार माध्यमांमधून केला जातो. यामुळे सामान्य माणसांच्या गोंधळात आणखी भर पडते. परिणामी ते मनोविकाराला बळी पडतात.
यामध्ये सोशल मीडियादेखील मागे नाही. फेसबुक, व्हॉटस् ऍपसारख्या सोशल माध्यमांचे व्यसन जडणारे अनेक लोक आपल्या आसपास आहेत. विशेषत: तरुणाईमध्ये हे प्रमाण जास्त आहे. तुम्ही काय घालता? कसे दिसता? कोणत्या वस्तू वापरता? तुमच्या सोशल मीडियावरील फोटोला, पोस्टला किती जण रिप्लाय करतात या सर्व गोष्टींचा प्रमाणाबाहेर विचार केल्यामुळे मनोविकार होऊ शकतो. त्यामुळे वेळीच याबाबत काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा