मनोरंजनावर हजार रुपये, पुस्तकांवर शून्य खर्च

ग्रंथ महोत्सवाच्या आयोजकांनी लक्षात घ्यावे असे भीषण वास्तव

सातारा – ज्येष्ठ नाटककार रा. ग. गडकरी, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगुळकर, साहित्य शिरोमणी पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे या महनीय व्यक्तींचे स्मरण करण्यासाठी ग्रंथ महोत्सव 4 जानेवारीपासून येथील सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरु होत आहे.या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असली तरी या निमित्ताने वाचनसंस्कृतीबाबत एका भीषण वास्तवाचा सामनाही आयोजकांनी करायला हवा. मनोरंजनाच्या विविध माध्यमांवर दरमहा 1000 ते 5000 रुपये खर्च करणारे बहुतेक जण वाचन संस्कृती जपण्यासाठी दरमहा पुस्तकांवर शुन्य रुपये खर्च करतात हेच ते वास्तव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरमहा केबल टीव्हीसाठी सुमारे 200 ते 500, मोबाईलच्या इंटरनेटसाठी किमान 500 रुपये, हॉटेलिंग आणि इतर अनुषंगिक बाबींवर 1000 ते 2000 रुपये खर्च करणारे पुस्तक खरेदीवर किती खर्च करतात हा संशोधनाचा विषय ठरु पहात आहे.आवडत्या लेखकांची पुस्तके खरेदी करणे बाजुलाच राहुदे,किरकोळ साप्ताहिके आणि मासिके किंवा वृत्तपत्रावरही खर्च करताना हजारवेळा विचार केला जात आहे.

वृत्तपत्राची किंमत थोडीजरी वाढली तरी वृत्तपत्र बंद करण्याचा विचार सुरु होतो.एकवेळ काही कारणाने पुस्तके आणि मासिके खरेदी करणे शक्‍य नसेल तर किमान एखाद्या वाचनालयाचे सदस्य होणे शक्‍य असते.पण हे प्रमाणही दुर्देवाने कमी आहे.विविध वाचनालयांच्या सदस्यसंख्येवर नजर टाकली तरी हे वास्तव लक्षात येउ शकते. मराठी पुस्तकांच्या किमती जास्त आहेत हे मान्य करुन पुस्तक खरेदी शक्‍य नसेल तर 50 रुपये वर्गणी भरुन महिनाभर भरपूर पुस्तके वाचणे शक्‍य आहे.पण तसे होत नाही.

दिवसभरात चहा आणि इतर काही गोष्टींवर 50 ते 100 रुपये खर्च करणारे दरमहा वाचनालयाची वर्गणी भरण्यास उत्सुक नसतात हे विशेष आहे. जुन्या पिढीतील लोकांनी आपली वाचनप्रियता जपली असली तरी नवीन पिढी मात्र तेवढी गंभीर नाही. स्पर्धा परीक्षांची पुस्तकांपुरतेच अनेकवेळा त्यांचे जग मर्यादित असते. महाविद्यालयीन मुलांना महाविद्यालयाची ग्रंथालये खुली असली तरी त्याचाही फक्त रेफरन्ससाठी वापर होतो. दरमहा भिशीमध्ये पैसे गुंतवणाऱ्या किती महिला पुस्तक भिशी योजनेच्या सदस्य असतात हाही संशोधनाचा विषय ठरु शकतो. एकंदर अशी परिस्थिती असताना ग्रंथ महोत्सवाच्या निमीत्ताने होणाऱ्या वाचन जागृतीचा फायदा करुन घेण्याची गरज आहे.

ग्रंथ महोत्सवाची चळवळ चार दिवसांची न राहता वर्षभर त्याचा प्रभाव राखण्यासाठी आणि वाचनसंस्कृती समृध्द होण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत.इतर अनावश्‍यक खर्च कमी करुन वाचनावर दरमहा थोडासा तरी खर्च करण्याची सवय नागरिकांना लागायला हवी. त्यासाठी वाचन चळवळीशी संबंधित सर्वानीच पुढाकार घ्यायला हवा.

आधुनिकता आणायला हवी
नवीन पिढीचा नवीन तंत्रज्ञानाकडे असलेला कल पहाता वाचन संस्कृतीतही आधुनिकता आणण्याची गरज आहे.इ पुस्तकांची चळवळ अधिक प्रभावी करायला हवी.युवकांच्या मोबाईलवर इ पुस्तक उपलबध्द झाले तर त्या पुस्तकाचे निश्‍तितच वाचन होईल आणि युवकांना सवयही लागेल. डिजीटल मीडियाचा अधिकाधिक वापर करुन युवकांना पुस्तकांकडे आकर्षित करण्याचा विचार व्हायला हवा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)