मनू भाकर-अनमोल यांना मिश्र दुहेरीत सुवर्णपदक

पात्रता फेरीत विश्‍वविक्रमाची नोंद


कुमारांची विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा

सिडनी – नेमबाजी जगतात खळबळ उडविणारी भारताची षोडशवर्षीय खेळाडू मनू भाकरने अनमोलच्या साथीत आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घालताना येथे सुरू असलेल्या कुमारांच्या विश्‍वचषक स्पर्धेवर वर्चस्व गाजविले.

मनू भाकर आणि अनमोल ही भारतीय जोडी 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातील मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून थांबली नाही. तर त्याआधी त्यांनी पात्रता पेरीत विश्‍वविक्रमी कामगिरीची नोंद करीत दुहेरी यश मिळविले.

आज झालेल्या अन्य स्पर्धांमध्ये भारताच्या गेनेमत सेखोनने ज्युनियर महिलांच्या स्कीट शूटिंग प्रकारातील अंतिम फेरीत 36 गुणांची नोंद करताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली. तसेच 10 मीटर एअर रायफल प्रकारातील मिश्र दुहेरी गटात भारताची 17 वर्षीय श्रेया आगरवाल आणि 19 वर्षीय अर्जुन बाबुता या जोडीने 432.8 गुणांची नोंद करताना कांस्यपदक जिंकले. याच प्रकारातील वैयक्‍तिक सुवर्णपदक जिंकणारी इलॅवेनिल वॅलरिवन आणि तेजस कृष्णा प्रसाद या जोडीला 389.1 गुणांचीच नोंद करता आल्यामनुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

या सर्वांच्या कामगिरीमुळे भारताला या स्पर्धेत सात सुवर्ण, तीन रौप्य व आठ कांस्य अशा एकूण 18 पदकांच्या कमाईमुळे गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखता आले. नेमबाजीतील महासत्ता मानल्या जाणाऱ्या चीनने 8 सुवर्णांसह एकूण 22 पदके पटकावीत गुणतालिकेतील अग्रस्थान राखलेआहे. इटली व ऑस्ट्रेलिया हे आघाडीवरील देश अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

त्याआधी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात वैयक्‍तिक व सांघिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनू भाकरने पात्रता फेरीत 770 गुणांचा विश्‍वविक्रम रचून आपल्या आगामी कामगिरीची चुणूक दाखविली. इतकेच नव्हे तर सर्वात नजीकची प्रतिस्पर्धी जोडी असलेल्या चीनच्या लियू जिनयाव व लि शु यांच्यावर त्यांनी 5.6 गुणांची आघाडीही घेतली होती. अंतिम फेरीतही भारतीय जोडीने पहिल्यापासून आपले वर्चस्व कायम राखले.

मनू भाकर व अनमोल यांनी चिनी जोडीवरील आघाडी वाढवीत नेली आणि अखेर 478.9 गुणांची मजल मारली. विद्यमान विश्‍वविक्रमापेक्षा त्यांची ही कामगिरी केवळ 1.8 गुणांनी कमी पडली. चीनच्या लियू जिनयाव व लि शु या जोडीने 473.3 गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. तर चीनच्याच वांग झेहाव व झियाव जियारुईशुआन या जोडीला 410.7 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गौरव राणा व महिमा तुऱ्ही या अन्य भारतीय जोडीला 370.2 गुणांचीच मजल मारता आली.

तत्पूर्वी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात वैयक्‍तिक सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने देवांशी राणा व महिमा आगरवाल यांच्या साथीत भारताला याच प्रकारातील सांघिक सुवर्णपदकही जिंकून दिले. त्याचप्रमाणे भारताची षोडशवर्षीय नेमबाज इलॅवेनिल वॅलरिवन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत विश्‍वविक्रमी कामगिरीसह दुहेरी मुकुटाचीही कमाई केली आहे. त्यानंतर अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात वैयक्‍तिक सुवर्णपदक पटकावताना भारताला सांघिक स्पर्धेत रौप्यपदकही मिळवून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)