पुणे: समाजात काही लोक प्रतिगामी विचार पसरवण्याचे काम करीत आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. हा मनूवाद संपविण्यासाठी महात्मा फुले यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. असे आवाहन माजी केंद्रिय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या 128 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समता दिन कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आज महात्मा जोतिबा फुले यांच्या १२८ व्या स्मृतिदिनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते माझा सन्मान करण्यात आला. मी विनम्रपणे हा सन्मान स्वीकारतो व समता परिषदेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
‘महात्मा फुले यांनी उभं आयुष्य विचारांसाठी घालवलं. समाजाला सन्मान दिला. विचाराने काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. वेगळ्या विचारांचं वारं वाहत असताना समाजाला समता आणि विकासाच्या मार्गावर आणलं. महात्मा फुलेंनी शिक्षणाचं सार्वत्रीकरण केलं. विरोध असताना सावित्रीबाईंना शिकवून स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला. शेतकरी पुढे गेल्याशिवाय समाज पुढे जात नाही, हे त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी समाजाला आधुनिकतेचा विचार दिला. आज मात्र प्रतिगामी विचार पुढे आणला जात आहे. मनुवादाचा विचार अजून संपलेला नाही. मनूवाद संपवायचा असेल तर फुले दाम्पत्यांचे विचार पुढे न्यावे लागतील’, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. असे शरद पवार म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा