मनाला मोहित करणारा “मनमर्झिया”

बॉलीवूड आणि प्रेमकथा यांचे एक अतूट नाते आहे. त्यातही पंजाब म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक वेगळीच वातावरण निर्मिती टिपिकल बॉलीवूड प्रेमपटातून झालेली आहे. अशा परिस्थितीत अनुराग कश्‍यप प्रेमकथा दिग्दर्शित करतोय म्हटल्यावर मनमर्झिया बद्दल उत्कंठा निर्माण झाली नसती तरच नवल. विकी कौशल, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आजच्या युवा वर्गाचे प्रतिनिधीत्व करतो.

मनमर्झियाची कथा पंजाबमधील अमृतसर शहरामध्ये घडते. हॉकीच्या साहित्याचं दुकान चालवणारी बिनधास्त स्वभावाची रूमी ( तापसी पन्नू ) आणि डीजे बनायचं स्वप्न घेऊन जगणारा तिचा बॉयफ्रेंड विकी संधू (विकी कौशल) यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. त्यांचे नाते घरी समजते तेंव्हा त्यांच्यावर लग्न करण्याचा दबाव येतो, रुमी नव्या नात्यात अडकायला उत्सुक आहे मात्र विकीला लग्नाच्या बेडीत अडकायचे नाही.

दरम्यान लंडनला बॅंकिंगमध्ये असणाऱ्या रॉबीचे (अभिषेक बच्चन) स्थळ रुमीसाठी येते. रॉबी हा स्वभावाआने विकीच्या अगदी विरुद्ध. शांत, कमालीचा समंजस, स्थैर्य असणारा आहे. एका बाजूला बेधुंद शारीरिक प्रेम आणि जराही न रोखू शकणारी एकमेकांची ओढ पण तितकाच अस्थिरपणा आणि दुसरीकडे सामंजस्य, हळूवारपणा आणि स्थैर्य. या दोघांमध्ये अडकलेली रुमी अखेर काय निर्णय घेते हे जाणून घेण्यासाठी मनमर्झिया चित्रपटगृहात जाउन बघायला हवा.

दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांची एक स्वतंत्र शैली आहे, टिपीकल फंदात न अडकता हा दिग्दर्शक थेट भाष्य करतो, यामुळेच पंजाबची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट आपल्याला कुठेही सरसो के खेत, बड्डी बड्डी गाडीयॉं आणि इतर आभासी जगात घेउन न जाता अमृतसर शहराच्या गल्ली बोळात घेउन जातो. हा चित्रपट बघताना हम दिल दे चुके सनम आठवतो, मात्र दोन्ही चित्रपटांच्या मांडणीत मोठा फरक आहे. मनमर्झियाची लांबी थोडी जास्त आहे, मात्र नेमकी पटकथा असल्याने प्रेक्षक कंटाळत नाहीत. संवाद खुमासदार शैलीत आहेत.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर तापसी पन्नूने रुमीची व्यक्तीरेखा जिवंत केली आहे, तिथे तुम्हाला तापसी भेटतच नाही. बिनधास्तपणा, मनाला जे पटेल ते करायची ताकद, तिच्यातली हिंमत, तरीही असलेला हळवा कोपरा हे सगळं अगदी उत्कृष्ट उभं केलंय. तिच्या व्यक्तिरेखेत एक जबरदस्त समतोल आहे.. पहिलं प्रेम, स्वतःच्या विचारांबाबत असणारा गोंधळ, राग, लोभ या गोष्टी तिने अगदी सहज भावाने उभ्या केल्या आहेत. मसान, संजू, राझी मधून आपल्या अभिनयाने वाहवा मिळवलेला विकी कौशल इथेही आपल्याला प्रभावीत करतो. अभिषेक बच्चनने. संयमी, शांत अशी व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे साकारली आहे, युवा, सरकारनंतर पुन्हा एकदा त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. इतर कलाकारांनी या तिघांना उत्तम साथ दिली आहे.

चित्रपटाचे संगीत ही एक मोठी जमेची बाजू आहे. अमित त्रिवेदीने दिलेलं संगीत. अगदी सुरुवातीपासुनच आपल्याला कथेशी एकरूप करतं, संगीताच्या आणि प्रसंगांच्यामध्ये जुळ्या बहिणींचा केलेला वापर लक्षात राहतो.
मनमर्झिया बद्दल थोडक्‍यात सांगायचे तर शारीरिक आणि मानसिक प्रेम, आजच्या युवा वर्गाचा गोंधळ आणि त्याचवेळी समंजसपणा अशा विविध पातळ्यावर थेट भाष्य करणारा हा एक मनाला मोहित करणारा अनुभव आहे.

सिनेमा – मनमर्झिया
निर्माता – आनंद राय, विकास बेहेल, विक्रमादित्य मोटवानी, अनुराग कश्‍यप
दिग्दर्शक – अनुराग कश्‍यप
संगीत – अमित त्रिवेदी
कलाकार – अभिषेक बच्चन, विकी कौशल, तापसी पन्नू, सौरभ सचदेव, विक्रम कोचर, अंशुल कौर, पवन मल्होत्रा
रेटिंग – 3.5  .
– भूपाल पंडित


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)