मनाचा प्रसन्न ऋतू 

डॉ. न. म. जोशी 

एक घरंदाज व्यापारी होते. धनसंचय केला तरी ते समाजाला मदतही करीत असत. त्यांचा मुलगा आता लग्नाच्या वयाचा झाला होता. त्याच्यासाठी वधुसंशोधन करणार होते. “आपल्या घरात मुलगी अशी यावी की, जी आपलं घर उत्तम सांभाळेल आणि घराण्याचं नाव राखेल.’ असं त्यांना वाटलं.
कशी निवडणार वधू?
त्यासाठी त्यांनी एक वेगळाच मार्ग अवलंबिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुली सांगून आल्या की, त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं ते उत्तम स्वागत करीत आणि मुलीला प्रश्‍न विचारीत.
सर्व ऋतूमध्ये उत्तम ऋतू कोणता?
एका मुलीनं उत्तर दिलं…
“उन्हाळा हा ऋतु उत्तम. कारण त्या दिवसात वसंत असतो. नवी पालवी फुटते. थोडं ऊन असलं तरी बाहेर टेकड्यांवर फिरायला गेलं की बरं वाटतं. कपड्यांची फार आवश्‍यकता नसते. तलम कपडे वापरता येतात. उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सुट्ट्या असतात. त्यामुळं हा ऋतु चांगला.
दुसरी एक मुलगी सांगून आली.

तिलाही त्यांनी हाच प्रश्‍न विचारला. ती म्हणाली, “हिवाळा सर्व ऋतूमध्ये चांगला. वातावरण थंड असतं. ऊबदार कपडे घालता येतात. भूक चांगली लागते. सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. याच दिवसात अनेक चांगले सणसमारंभ असतात. त्यामुळे हिवाळा हा ऋतू चांगला.’
तिसरी मुलगी सांगून आली. तिलाही हाच प्रश्‍न विचारला. ती म्हणाली, “सर्व ऋतूंमध्ये वर्षाऋतू चांगला. पावसाळा असतो. तापलेली जमीन थंड होते. शेतकरी आपली पिके घेण्यात मग्न असतात, ज्यामुळे वर्षभर अन्नधान्य मिळते. सगळीकडे हिरवाई असते. आपले अनेक सणसमारंभ याच ऋतूत असतात. नागपंचमी, रक्षाबंधन, गुरूपौर्णिमा, गणेशोत्सव असे कितीतरी सण असतात. पावसाच्या धारांमध्ये भिजायला मुलांना आनंद वाटतो मलाही वर्षाऋतू खूप आवडतो. म्हणून वर्षा हाच ऋतू सर्व ऋतूत चांगला.’

व्यापारी विचारात पडला. कुणाची निवड करावी? एवढ्यात आणखी एक मुलगी सांगून आली. त्यांनी तिलाही हाच प्रश्‍न विचारला.
त्या मुलीनं थोडं थांबून नम्रपणे उत्तर दिलं.
“उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीनही ऋतू आपापल्या परीनं चांगलेच आहेत. प्रत्येकाचं आपल्या जीवनात स्थान आहे. पण हे ऋतू चांगले केव्हा वाटतील? आपलं शरीर आणि आपलं मन प्रसन्न असेल तेव्हा. माझं उत्तर आहे की तनमनाचा प्रसन्न ऋतू हाच सर्व ऋतूत चांगला.
व्यापाऱ्यानं या मुलीची सून म्हणून निवड केली.

कथाबोध 
“मन है चंगा तो काथवट मे गंगा’ असं म्हणतात ते खरं आहे. प्रसन्नता ही मनात असावी लागते तरच बाहेरच्या प्रसन्नतेचा लाभ आपण घेऊ शकतो. म्हणून मन करावं प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. हा संदेश लक्षात ठेवावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)