मनसे आमदारांचे उद्धव ठाकरेंसमोर लोटांगण

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत गुफ्तगू ः राजकीय चर्चांना उधाण

श्रीकृष्ण पादिर

पुणे-काही महिन्यांपूर्वी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना जुन्नर तालुक्‍यातील ओतूर येथे आणून मनसेचे राज्यातील एकमेव आमदार जुन्नरचे शरद सोनवणे यांनी आपण मनसेचेच शिलेदार आहोत हे दाखवून दिले होते; मात्र आज आमदार सोनवणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे जाताना त्यांच्यासमोर थेट लोटांगण घातले. यानंतर शिवसेना सचिव तथा ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याशीही गुफ्तगू केल्याने राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या साऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी 8 वाजता शिवनेरीची माती घेतली. ही माती घेऊन ते 24 तारखेला अयोध्येला जाणार आहेत. दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे तसेच स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासह मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी देखील आवर्जून हजेरी लावली. खरे तर हा शिवसेनेचा खासगी दौरा असताना मनसेच्या आमदाराची उपस्थिती शिवसैनिकांना (विशेषतः विधानसभेच्या इच्छुकांना) कितपत रुचली हे त्यांनाच ठाऊक. यानंतर ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर व मनसेचे जुन्नरचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची हेलिकॉप्टरजवळ फक्‍त दोघांतच “चर्चा’ झाली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर आले आहेत. ही चर्चा नक्की कोणत्या विषयावर झाली? याबाबत तालुक्‍यातील जनतेत उत्सुकता आहे. सोनवणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यांची कार्यशैलीदेखील शिवसेनेसारखी आहे. ते पक्षात आले तर जुन्नरची जागा तर येईलच; शिवाय ज्या शिवरायांनी संपूर्ण हिंदुस्थानात भगवा फडकवला त्यांच्याच जन्मभूमीत विजयाची सुरुवात करून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
वास्तविक पाहता आमदार सोनवणे यांचे इतर पक्षांतील नेत्यांशी असे वागणे जुन्नरकरांना नवीन नाही. याआधी दोन वर्षांपूर्वी जुन्नर बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सभेतही थेट हजेरी लावून “पवारसाहेब मी तुमचाचच आहे’ असे विधान केल्याचे जुन्नरकरांच्या चांगलेच स्मरणात आहे. सहा महिन्यांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात व्यासपिठावरून त्यांची तोंडभरून स्तुती करतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते कसे चांगले आहेत, याचेही गुणगान गायले होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशीही त्यांचे संबंध “बरे’ असेच आहेत. भोसरीचे भाजप पुरस्कृत आमदार महेश लांडगे यांच्याचशी त्यांची जीवलग मैत्री सर्वश्रुतच आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. सोनवणे हे 2019ची विधानसभा निवडणूक लढविणार हे निश्‍चित असले तरी आजच्या कृतीवरून त्यांनी राजकीय धुरीणांना पुन्हा एकदा बुचकाळ्यात टाकले आहे हे नक्की! तूर्तास सोनवणे यांचे राज्यातील सर्वच नेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत, त्यामुळे आगामी काळात ते कोणता निर्णय घेतात याकडे तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

  • टीका-टिप्पणीपेक्षा विकासाला महत्त्व
    आमदार शरद सोनवणे यांचे कार्यक्रम, भाषणे ऐकली असता त्यांनी विकासकामे व जनतेशी जवळीक यावरच अधिक भाष्य केले आहे. कोणत्याही राजकीय नेत्यावर क्वचित प्रसंग वगळता त्यांनी टीका केलेली आढळून आली नाही. आपली मैत्री सर्व पक्षांतील नेत्यांसाबत असल्याचे ते सांगतात. राजकीय मतभेद विसरून विकासकामांसाठी कोणत्याही नेत्याला अलगदपणे जवळ करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पक्ष नव्हे; तर जनता महत्त्वाची असा त्यांचा व्होरा असतो. आमदार म्हणून न्वहे तर सर्वसामान्यांचा शिलेदार म्हणून वागणे आणि लहान-मोठा असा मतभेद न करता सर्वांच्या मांडीला मांडी लावून बसणे यामुळे समाजात ते लोकप्रिय आमदार आहेत.
  • आपला माणूस आपली आघाडी फेल?
    “इंजिनाच्या चिन्हावर मते मिळणार नाहीत’ असे विधान करीत जुन्नर नगरपरिषद, जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत आमदार शरद सोनवणे यांनी “आपला माणूस आपली आघाडी’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली; मात्र जुन्नर नगरपरिषदेतील एक-दोन जागा वगळता इतर सर्व ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढायची याबाबत आतापर्यंत जी काही विधाने झाली आहेत; त्याला महत्त्व देण्यापेक्षा किल्ले शिवनेरीवरील घटनेवरून ते उद्धव ठाकरे पर्यायाने शिवसेनशी जवळीक साधू पाहत आहेत, हे ओळखण्यात राजकीय धुरीण नक्कीच तरबेज आहेत!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)