मनसेच्या “राज’कारणात पैलवान “गळा’ला

शिरूरमधून खासदारकीची इच्छा : राज ठाकरेंचाही सकारात्मक प्रतिसाद

  • श्रीकृष्ण पादिर

पुणे – सन 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले असेले तरी मनसेचा एकमेव आमदार अनपेक्षितपणे जुन्नरमधून निवडून आला. किंबुहना इथे पक्षापेक्षा व्यक्‍तीला मतदारांनी महत्त्व दिले. याचाच धडा घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेसाठी साखरपेरणी आतापासून सुरू केलेली दिसतेय. गेली चार वर्षे आपल्या एकमेव आमदाराच्या मतदारसंघात न फिरकणारे राज ठाकरे यांनी ओतूर येथे एका भव्यदिव्य कुस्ती आखाड्याच्या निमित्ताने आवर्जून भेट दिली. आखाडा कुस्तीचा असला तरी राज ठाकरे राजकीय आखाडा कसा रंगवतात? याकडे धुरीणांचे लक्ष असणार हेही तितकेच खरे!
राज ठाकरे भाषणाला उभे राहताच मी राजकीय बोलणार नाही असे सांगितले; मात्र राजकारणाबाबत बोलणार नाहीत, ते राज ठाकरे कसले? आपल्या आमदाराचे त्यांनी तोंडभरून कौतुक करताना शिरूर लोकसभेसाठीही त्यांनी चाचपणी केली. त्याचे कारण म्हणजे कुस्तीच्या आखाड्याबरोबर राजकीय आखाडाही गाजवणारे पै. मंगलदास बांदल यांची व्यासपिठावरील उपस्थिती. याच बांदलांना गळाला लावण्यात आमदार शरद सोनवणे आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यशस्वी झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. निमित्त काहीही असले तरी शरद सोनवणे यांनी धूर्त राजकारणी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमानिमित्ताने त्यांनी खासदारकीची लढण्याची संधी शोधणाऱ्या मंगलदास बांदलांना व्यासपिठावर आणले. इतर पक्षात प्रयत्न करूनही संधी मिळत नाही याची खातरजमा बहुधा बांदलांना झाली आणि म्हणूनच माईकचा ताबा घेतल्यानंतर खुद्द राज ठाकरेंच्या समोर त्यांनी स्वतःची मनातील ही सुप्त इच्छा बोलून दाखवली. राज ठाकरे यांनीही तात्त्काळ आपल्या भाषणात त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, शरद सोनवणे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला मनसेकडे दमदार उमेदवार असणार अशी अटकळ बांधायला हरकत नाही.

भाजप-सेना युती झाल्यास…
शिवसेना कितीही म्हणत असली स्वबळावर लढायचे तरी नुकत्याच झालेलय महामंडळ नियुक्‍त्यांमध्ये शिवसेनेच्या अनेकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे येत्या काळात युती होण्याचीच दाट शक्‍यता आहे. न झाल्यास आमदार महेश लांडगे हे मैदान मारण्यास शड्डू ठोकूनच आहेत; परंतु या दोन पक्षांत युती झाल्यास शिरूर लोकसभेची जागा अर्थातच शिवसेनेकडे राहील. यावेळीही खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असतील. मात्र आमदार महेश लांडगे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यातले सख्य पाहता भाजपकडून खरेच युती धर्म पाळला जाईल का? याबाबत शंका आहे. अशावेळी एक पैलवान (लांडगे) दुसऱ्या पैलवानाच्या (बांदल) मदतीला धावून जाऊ शकतो.

पिंपरीच्या महापौरांचीही निष्ठा कायम
पिंपरीचे महापौर राहुल जाधव हे सध्या भाजपकडून महापौर असले तरी त्यांनी राज ठाकरेंवरील निष्ठेला तितकेच प्राधान्य दिले आहे. याची प्रचिती पिपंरी चिंचवडमध्ये यापूर्वी आली आहे. महापौर झाल्यानंतर राज ठाकरे यांचे पाय धरणेही त्यांना अजिबात कमीपणाचे वाटले नाही. ओतूरमध्येही राज ठाकरे येणार म्हटल्यावर राहुल जाधव यांनी आवर्जून हजेरी लावली. यामध्येही त्यांचा स्वार्थ म्हणा किंवा गनिमी कावा असू शकतो. महापौर झाल्यानंतर अनेकांना आमदारकीचे वेध लागतात, यापूर्वीचे त्यांचे बंड पाहता तशी शक्‍यता भाेसरी विधानसभा मतदार संघात नाकारता येत नाही.

मंगलदास बांदलांकडून चाचपणी
जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेल मंगलदास बांदल कधी काय चाल खेळतील याचा कयास लावणे भल्याभल्यांना अद्याप जमले नाही. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या मतदारसंघातून लढलेले बांदल यांची विजयाची घौडदौड रोखणे मोठ्या धुरीणांनाही जमले नाही. फड कुठलाही असो विरोधकांना धूळ चारण्यात ते नेहमीच यशस्वी ठरले आहेत. यापूर्वी आमदारकीची स्वप्ने पाहणारे बांदल यांनी 2014पासून खासदारकीची लढविण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना उमेदवारी देण्याचे आवाहन त्यांनी अनेकदा केले आहे. मात्र पक्षांतर्गत कुरघोड्या लक्षात घेता त्यांना राष्ट्रवादीने यावेळी जिल्हा परिषदेसाठीही तिकीट दिले नाही. हेच ओळखून त्यांनी राज ठाकरेंसमोर आली इच्छा बोलून दाखवली. आता ती किती फळाला येतेय ते येणाऱ्या काळात दिसेलच!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)