मनपा आयुक्तपदी जिल्हाधिकारींची नियुक्‍ती कायम रहावीे

पुरोहित मंडळाची सह्यांची मोहिम ः सर्वस्तरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद
नगर – महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कार्यभार सांभाळल्यापासून नगर शहर विकासाच्या दिशेने जात आहे. अतिक्रमण मोहिम प्रभावीपणे राबविण्याबरोबरच महापालिकेचा कारभारही त्यांनी सुधरवला आहे. नगरला आतापर्यंत आलेल्यांपैकी सर्वांत कार्यक्षम हे जिल्हाधिकारी आहेत. आजपर्यंत कोणीही त्यांच्या इतके कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही, त्यामुळे भविष्यात नगर शहर हे अजून विकसित व्हावे, नगरचा कायापालट व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यांना मनपाच्या आयुक्तपदी शासनाने कायम ठेवावे, अशी मागणी करत जिल्हा पुरोहित मंडळाच्यावतीने शहरातील चौपाटी कारंजा चौकातील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ सह्यांची माहिमेचा उपक्रम राबविला.
जिल्हाधिकाऱ्यांना प्रभारी आयुक्त पदावरुन हटविण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नगर शहरातील नागरिकांनी सकाळपासूनच उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विविध क्षेत्रातील नागरिकांचा या उपक्रमाला पाठिंबा मिळाला.
पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी, सचिव मयुर जोशी यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत सर्व क्षेत्रातील नागरिकांबरोबरच काही अंध व्यक्तींनीही सह्या करुन आपला पाठिंबा व्यक्त केला. महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार पाहणारे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना आयुक्त पदावरुन हटविण्याच्या हालचाली नगर शहराचे विकासशत्रू असलेल्या लोकांनी सुरु केलेल्या आहेत. मात्र द्विवेदी सारख्या कार्यक्षम व धडाक्‍याबाज अधिकाऱ्याला नागरिकांचा पाठिंबा मिळावा, त्यांच्या या कार्यात नागरिक त्यांच्या सोबत आहेत. हे दर्शविण्यासाठी ही सह्यांची मोहिम राबविण्यात आली. अल्पावधीतच सह्यांकरीता लावलेला मोठा फ्लेक्‍सबोर्ड सह्यांनी भरुन गेला.
यावेळी जागरुक नागरिक मंचचे सुहास मुळे, पंडित दीनदयाळ पंतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, मुकुल गंधे, वैभव जोशी, निलेश धर्माधिकारी, ऍड.उमेश नगरकर, श्‍याम कडेकर, राजाभाऊ पोतदार, प्रदीप जोशी, विभव निसरगंड, तुषार तांबोळी आदिंसह पुरोहित मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)