मनजित सिंगला 36 वर्षांनंतर सुवर्ण 

पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सनला रौप्यपदक 
जकार्ता: नोकरी नसल्याने बेकारीशी झुंज देणारा भारताचा युवा धावपटू मनजित सिंगने पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घालताना आशियाई क्रीडास्पर्धेचा 10वा दिवस गाजविला. तसेच जिन्सन जॉन्सनने याच शर्यतीत रौप्यपदक जिंकताना भारताला दुहेरी यश मिळवून दिले. भारताने 36 वर्षांनंतर या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. तेजिंदर पाल आणि नीजर चोप्रानंतर भारताचे ऍथलेटिक्‍समधील हे तिसरे सुवर्ण ठरले आहे.
मनजित सिंग आणि जिन्सन जॉन्सन यांनी या शर्यतीवरील भारतीय धावपटूंचे वर्चस्व सुरुवातीपासून अखेरपर्यंत कायम राखले. मनजित सिंगने एक मिनिट 46.15 सेकंदांत अंतिम रेषा ओलांडताना सुवर्णपदकाची कमाई केली. तर जिन्सनने एक मिनिट 46.35 सेकंदांत दुसऱ्या क्रमांकाने अंतिम रेषा पार करताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. कतारच्या अब्दल्ला अबूबाकरने एक मिनिट 46.38 सेकंदांत कांस्यपदक मिळविले.
भारताने 1982 नंतर या पकारांत पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले आहे. त्या वेळी चार्ल्स बोरोमेवने भारताला सोनेरी यश मिळवून दिले होते. तसेच या शर्यतीत सुवर्ण व रौप्ययपदक मिळविण्याची भारताची 1951 नंतर ही पहिलीच वेळ ठरली. त्या वेळी रणजित सिंग व कुलवंत सिंग यांनी ही कामगिरी केली होती.
मिश्र रीले संघाला रौप्यपदक 
मिश्र सांघिक 4 बाय 400 मीटर रीले शर्यतीत भारतीय संघाने रौप्यपदकाची कमाई करीत ऍथलेटिक्‍समधील भारताची आगेकूच कायम राखली. या शर्यतीचा आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात महंमद अनास, राजीव अरोकिया, पूवाम्मा माचेट्टिरा आणि हिमा दास या धावपटूंचा समावेश होता. भारतीय रीले संघाने 3 मिनिटे 15.71 सेकंद वेळ देताना दुसऱ्या क्रमांकासह रौप्यपदकाची निश्‍चिती केली. दरम्यान महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताची सुरिया लोगानाथन पाचव्या, तर संजीवनी जाधव सातव्या क्रमांकावर राहिली. तर महिलांच्या भालाफेकीत भारताच्या अन्नू राणीने 53.93 मीटर फेकीसह सहाव्या क्रमांकाची निश्‍चिती केली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)