मध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात 

भोपाळ: मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवारी समाप्त झाली. त्यामुळे त्या राज्यातील चित्र स्पष्ट झाले असून विधानसभेच्या एकूण 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

मध्यप्रदेशात 28 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीच्या माध्यमातून तब्बल 1 हजार 102 अपक्ष उमेदवार नशीब आजमावणार आहेत. सत्तारूढ भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. त्याखालोखाल भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेसने 229 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. कॉंग्रेसने 1 जागा ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दलासाठी सोडली आहे. बहुजन समाज पक्षही (बसप) तब्बल 227 जागा लढवत आहे. तर समाजवादी पक्षाने (सप) 51 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

प्रथमच मध्यप्रदेशची निवडणूक लढवत असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) 208 उमेदवार जाहीर केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान यांना यावेळी बुधनी मतदारसंघात कडवी लढत द्यावी लागण्याची शक्‍यता आहे. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने माजी केंद्रीय मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष अरूण यादव यांना उतरवले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 जागा पटकावल्या होत्या. तर कॉंग्रेसला 58 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्या निवडणुकीत बसपला 4 आणि अपक्षांना 3 जागा मिळाल्या होत्या. मध्यप्रदेशात सलग 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्या पक्षाला यावेळी सत्तेतून दूर करण्याचा चंग कॉंग्रेसने बांधला आहे. त्या राज्याची सत्ता कुणाकडे जाणार याचा निकाल 11 डिसेंबरला लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)