मधुर, रसाळ गरे असणाऱ्या फणसाची आवक सुरू

हंगामाच्या सुरुवातील मागणी कमी


कापा जातीची कर्नाटकातून आवक

पुणे – चवीला गोड, रसाळ गरे असलेला फणस म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाचा पाणी सुटेल. हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डातील फळ विभागात मंगळवारी कर्नाटकातून 4 ते 5 ट्रक फणसाची आवक झाली. सुरुवातीला सध्या मागणी कमी आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत आवक आणि मागणी वाढेल, अशी व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
व्यापारी सलीम शेख म्हणाले, साधारणत: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कापा जातीच्या फणसाची बाजारात आवक सुरू होत असते. सध्या 2 किलोपासून 10 ते 12 किलो वजनामध्ये फणस उपलब्ध आहेत. त्याला घाऊक बाजारात प्रती किलोला 8 ते 10 रुपये भाव मिळत आहे. त्याला शहरातील विविध भागातील विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दरम्यान, 20 ते 25 एप्रिलदरम्यान कोकणातून बरका या जातीच्या फणसाची आवक वाढेल असेही त्यांनी सांगितले.
बरका आणि कापा दोन जातींमध्ये फणस आढळून येतो. सध्या फळबाजारात कापा या फणसाची आवक सुरू झाली आहे. चवीला गोड आणि रसाळ असलेल्या या फणसाची कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात आवक राहाते. गेल्या महिनाभरापासून फणसाचा हंगाम सुरू झाला आहे; तर येत्या दोन आठवड्यात कोकणातून बरका या जातीच्या फणसाची मोठी आवक राहील. हा फणस अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात. फणसाच्या गऱ्याचा आस्वाद घेतल्यानंतर त्यामध्ये असलेल्या आठळ्या, तसेच छोट्या कच्च्या फणसाचा (कुइरी) भाजीमध्ये वापर करण्यात येतो. फणसापासून साकट्याची भाजी, कच्च्या फणसाच्या गऱ्याची भाजी, सांजणे (फणस इडली), तळलेले गरे, फणसाची साठे (फणस पोळ्या), आठळ्यांची भाजी, पावेची भाजी, उकडलेल्या आठळ्या, साट आदी पदार्थ तयार होत असल्यामुळे गृहिणींकडूनही फणसाला मोठी मागणी राहात असल्याचेही त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)