मधुमेहात व्यायामाचे महत्व

टाईप 1 मधुमेहाला इन्सुलिनवर अवलंबून असलेला मधुमेह किंवा ज्युवेनाइल मधुमेह म्हणतात. हा मधुमेह कमी वयात मुलांवर परिणाम करतो. या विकारात स्वादुपिंडातील बिटा पेशी नष्ट होतात आणि रुग्णाला इन्सुलिन बाहेरून घ्यावे लागते.
टाईप 1 मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी राहणीमानाच्या शैलीत सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सेवन केल्या जाणाऱ्या कॅलरींच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे, व्यायाम आणि वजन कमी करणे यामुळे टाईप 1 मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये कमालीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
व्यायामामुळे तुमच्या शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. टाईप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांना व्यायामामुळे फायदा होतो कारण त्याने तुमची इन्सुलिनच्या प्रति असलेली संवेदनशीलता वाढते.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे, व्यायामानंतर तुमच्या शरीराला कर्बोदकांवर प्रक्रिया करण्यासाठी जास्त इन्सुलिन लागत नाही. तुमच्या मुलाला जर टाईप 1 मधुमेह असेल तर त्याला किंवा तिला पुरेसा व्यायाम करायला सांगा. हे मधुमेह व्यवस्थापनासाठी चांगलेच आहे, त्याचप्रमाणे बालपणापासूनच त्याला निरोगी आरोग्यासाठी आवश्‍यक असणारी महत्त्वाची सवय जडेल.
मधुमेहामुळे होणारे दीर्घकालीन परिणाम, विशेषत: हृदयविकार व्यायामामुळे टाळता येऊ शकतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींना आर्टरी ओस्क्‍लेरॉसिस होऊ शकतो. हा विकार झाल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता असते. व्यायामामुळे तुमचे हृदय निरोगी आणि बळकट राहते.
त्याचप्रमाणे व्यायामामुळे तुम्हाला चांगले कोलेस्टरॉल राखता येते. ते राखल्यास आर्टरी ओस्क्‍लेरॉसिस टाळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे व्यायामामुळे रक्‍तदाब कमी राहणे, वजनावरील नियंत्रण, चरबी नसलेले व बळकट स्नायू, बळकट हाडे इत्यादी पारंपरिक लाभ होतातच.
सध्या आपण टेक्‍नोसॅव्ही काळात जगत आहोत. आताच्या काळात लोकांना मोबाईल फोनसारख्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचे व्यसन जडले आहे. मुलेसुद्धा टीव्ही पाहण्याला आणि व्हीडिओ गेम खेळण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांची एकूण शारीरिक हालचाल कमी होते आणि व्यायामही कमी होतो.
ही अत्यंत चिंतेची बाब आहे. कारण त्यामुळे स्थूलपणा बळावू शकतो आणि इन्सुलिनच्या प्रति असंवेदनशीलता वाढीस लागू शकते. त्याचप्रमाणे इतर काही घटकांचा भर पडला तर मधुमेह जडू शकतो.
यात सुधारणा करून ही परिस्थिती सहज हाताळता येऊ शकते. आपण मुलांना मैदानावर जाऊन व्यायाम करण्यास सांगू शकतो. शाळांमध्ये सुद्धा व्यायामाचे वर्ग घेतले जाऊ शकतात. पोहणे, एरोबिक्‍स, चढणे, धावणे इत्यादींची आवड मुलांमध्ये निर्माण करावी. घरीसुद्धा पालक आपल्या मुलांशी काही वेळ खेळू शकतात. त्यामुळे मुलांचा सर्वागीण विकास होईल. त्याचप्रमाणे स्थूलपणा, हृदयविकार आणि मधुमेहासारखे राहणीमानामुळे होणारे विकार मुलांना जडणार नाहीत.
कृत्रिम स्वादुपिंड…
मधुमेह हा जगातील सर्वात धोकादायक आजार आहे. तो कधीही बरा होत नाही. त्यामुळे त्याच्या रुग्णांना गोळ्या किंवा इन्शुलिन इंजेक्‍शनवर आयुष्यभर जगावे लागते. आता या रुग्णांना दिलासा देणारे संशोधन केंब्रिज विद्यापीठाने जाहीर केले आहे. या विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम स्वादुपिंड तयार केले असून ते 2018 पर्यंत बाजारात उपलब्ध होणार आहे. यामुळे मधुमेही रुग्णांना सर्वसामान्य जीवन जगणे शक्‍य होणार आहे.
सध्या मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर तपासण्यासाठी आणि शरीरात इन्शुलिन किती प्रमाणात द्यावे हे कळण्यासाठी दोन यंत्रे वापरावी लागतात. मात्र, कृत्रिम स्वादुपिंड रक्तातील साखरेचे प्रमाण ओळखून त्यानुसार इन्शुलिन शरीरात मारा करेल, असे संशोधकांनी सांगितले. या संशोधनामुळे टाईप-1 मधुमेही रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंब्रिज विद्यापीठातील संशोधक रोमन होवोरका व हुड थाबिट म्हणाले की, आतापर्यंत घेतलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आहे. कृत्रिम स्वादुपिंडामुळे रुग्णांना मधुमेहाचे व्यवस्थापन करणे वेळ मिळेल. या स्वादुपिंडामुळे सातत्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बघण्याची आवश्‍यकता लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे कृत्रिम स्वादुपिंड बाजारात कधी मिळणार याबाबत रोमन होवोरका म्हणाले की, या यंत्राला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे. या यंत्राच्या चाचण्या सध्या सुरू असून 2017 मध्ये त्याला मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेने हे यंत्र 2018च्या अखेरीस युरोपियन बाजारात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. या कृत्रिम स्वादुपिंडावर आणखी व्यापक संशोधन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात कृत्रिम स्वादुपिंड शरीरात बसवणे शक्‍य होईल. तसेच त्यात इन्शुलिन निर्माण करणा-या पेशीही तयार करता येऊ शकतील. हे कृत्रिम स्वादुपिंड शरीरात बसवल्यानंतर रोगप्रतिबंधक यंत्रणा अधिक भक्कम करण्यासाठी खास औषधांची गरज लागेल. कृत्रिम स्वादुपिंडाबाबत अनेक क्‍लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)