गृहिणी, ज्युस विक्रेते, स्टॉलधारक, किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी

पुणे – मार्केट यार्डातील फळ विभागात मद्रास मोसंबीची आवक सुरू झाली आहे. हैदराबाद येथून येथील बाजारात आवक होत आहे. गोड, पिवळ्या रंगाच्या या मागणीला गृहिणी, ज्युसविक्रेते, स्टॉलधारक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मोठी मागणी आहे. तीन डझनाच्या मोसंबीला 250 ते 480 रुपये आणि चार डझनाच्या मोसंबीला 150 ते 160 रुपये मोजावे लागत आहेत. तीन आणि चार डझन मोसंबीला गेल्या वर्षीच्या तुलनेत 100 ते 150 रुपये अधिक भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी सोनू ढमढेरे यांनी दिली.
नुकताच औरंगाबाद भागातून आवक होणाऱ्या अडकन बहरातील मोसंबीचा हंगाम संपला आहे. त्यानंता मद्रास मोसंबीची आवक सुरू झाल्याचे सांगून ढमढेरे म्हणाले, मागील महिनाभरापासून बाजारात मद्रास या मोसंबीची आवक होत आहे. सध्या बाजारात दररोज 10 टन मोसंबीची आवक होत आहे. तिला प्रतवारीनुसार तीन डझनास 250 ते 480 रुपये, तर चार डझनास 150 ते 260 रुपये भाव मिळत आहे. मद्रास येथील या मोसंबीचा हंगाम आणखी दीड महिना सुरू राहिल. दरम्यान, यंदा मॉन्सून चांगला राहिल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून औरंगाबाद येथील अडकन बहराच्या मोसंबीची आवक सुरू होईल. त्यानंतर तो जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत सुरू राहील.
सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने स्थानिक मार्केटमध्ये या मोसंबीला मागणी वाढली आहे. पुणे बाजाराखेरीज दिल्ली, अहमदाबाद, सुरत, मुंबई आदी बाजारपेठांमध्ये मोसंबीला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. यंदा मोसंबीच्या उत्पादनातही घट झाल्याने बाजारात कमी प्रमाणात माल दाखल होत आहे. त्यामुळे, गेल्या वर्षीच्या तुलनेत भावात तीन ते चार डझनामागे 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा मद्रास मोसंबीचा हंगाम वेळेत सुरू झाला असून तो वेळेत संपेल. रमजान महिना संपल्यानंतर बाजारात आवक वाढून दर 50 ते 100 रुपयांनी घटतील अशी शक्‍यताही त्यांनी वर्तविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)