मद्यधुंद पत्नीने ओतले पतीच्या अंगावर गरम तेल

किरकोळ कारणावरुन झाला होता वाद : जखमी पतीवर उपचार सुरू

महिलेला वानवडी पोलिसांकडून अटक

पुणे – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून मद्यधुंद पत्नीने पतीच्या अंगावर गरम तेल ओतले, या घटनेत पती जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मद्यधुंद पत्नीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. 15 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वानवडी येथील सिक्रेट टाऊनशिपमध्ये ही घटना घडली.

जया भरत शेरसिया (वय 38, रा. सिक्रेट हार्ट, डी/ 7, वानवडी) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे, तर भरत अर्जुनराम शेरसिया (वय 26, रा. सीएसटी रोड, चेंबूर, मुंबई) असे जखमी झालेल्या पतीचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत हे मुंबईमध्ये नोकरी करतात, तर जया ही पुण्यात नोकरी करते. त्यामुळे जया पुण्यात तर भरत हे मुंबईमध्ये राहण्यास आहेत. 15 जुलै रोजी जया हिचा वाढदिवस होता, त्यामुळे भरत हे वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यात आले होते. बर्थ डेचे सेलिब्रेशन झाल्यानंतर भरत आणि जया हे दोघेही दारू पित बसले होते, त्यावेळी किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर भरत हे त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले, किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग आल्याने जया हिने झोपेत असलेल्या भरत यांच्या छातीवर आणि पोटावर गरम तेल ओतले. पोलीस उपनिरीक्षक जे. टी. हंचाटे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)