मदारी, नाणार व भागुबाई

   नीती अनीती

‘बच्चा लोग बजाओ ताली, नया खेल दिखाने आया है मदारी… नई कमाल, नई धमाल, चलो जल्दी जल्दी…’ मदारी चाचाने आरोळी ठोकली व आपले बस्तान रस्त्याच्या मधोमध मांडले.हातातली काठी, डमरू, दोरखंड व गाठोडे खाली ठेवले. खांद्यावरील भागूबाईला प्रेमळ नजरेने पाहिले व हातातील काठी आपटून खांद्यावरील मुक्काम हलवून रस्त्यावर येण्यास खुणावले. एव्हाना अबालवृद्ध, महिला व बच्चे कंपनीने गर्दी करण्यास सुरुवात केली होती.

-Ads-

मदाऱ्याने डमरू वाजवून खेळ सुरू झाल्याची घोषणा केली व भागुबाई या माकडिणीला नजरेनेच सर्वांना नमस्कार करावयास खुणावले. भागुबाईनेदेखील कुणाचाही हिरमोड न करता दोन वेळा कोलांटी उडी मारली व नमस्कार केला व दुसऱ्याच क्षणी दात विचकले. पब्लिकमध्ये हास्यस्फोट झाला. पब्लिक खूश आहे, कमाई छान होणार या विचाराने मदाऱ्याला देखील हुरूप आला.
‘बच्चा लोग बजाओ ताली… भागुबाईला आंबे खायला कोकणात जायचे का?’
मदाऱ्याने विचारताच भागुबाईने “हो’ म्हणून जोरजोरात मान डोलवली,

डोळ्यांवर गॉगल चढवला, स्प्रे फवारला, नवा शर्ट घातला व हातात काठी व गाठोडे घेऊन पब्लिकने रिंगण केले त्याला दोन राउंड मारले व कोकण आले, अशी खूण मदारीचाचाला केली. मदारीचाचाने भागुबाईला एक हापूस आंबा दिला जो त्याने मटकन खाऊन टाकला, साल व कोय पब्लिकमध्ये भिरकावली व पोटावर हात फिरवत मदारीचाचाकडे बघू लागला. पब्लिक मधून शिट्ट्या व टाळ्या सुरू झाल्या.

‘भागुबाई, पब्लिकला 15 लाख मिळाले की नाही? ‘अच्छे दिन’ आले की नाही ?’ मदारीने प्रश्न विचारला तसे नकारार्थी मान हलवीत भागुबाई तोंड फुगवून कोपऱ्यात जाऊन बसली. ‘भागुबाई, बुलेट ट्रेन सुरू करायची का, सासुरवाडीला लवकर जाता येईल.’बुलेट ट्रेनचे नाव ऐकताच भागुबाई चिडून मदारीच्या अंगावर धावली व काठी आपटतं मागे पळायला लागली. मदारी पण गोल गोल पळत होता. काही वेळाने मदारी थांबला व त्याने भागुबाईला गोंजारले. “बरं ओके. कोकणात मोठ्ठा प्रकल्प सुरू करूया, रोजगार मिळेल लोकांना, विकास होईल, प्रगती होईल, सुजलाम सुफलाम होईल .’

भागुबाई पुन्हा चिडली व रागाने काठी आपटली व मदारीच्या कानात येऊन काहीतरी पुटपुटली, मदारीचाचा पोट धरून हसायला लागला व गडागडा लोळत म्हणाला ‘काय? नवा प्रकल्पही नको, विकास नको? लोकांना काम मिळाले तर माझा खेळ बघायला कोण येणार असे भागुबाई म्हणतेयं! घ्या, कुणाला कशाची चिंता तर कुणास कशाची !’ मदारीने असे डिवचताच भागुबाई पुन्हा बिथरली व काठी आपटतं मदारी चाचाच्या मागे पळू लागली.

पब्लिकने टाळ्या व शिट्ट्या वाजवण्यास सुरुवात केली, मदारीने चटकन चादर पसरली, पब्लिकनेही मुक्‍त हस्ताने चिल्लर टाकायला सुरुवात केली. काही दिलदारांनी दहा-वीसच्या नोटा टाकल्या. मदारीने इशारा करताच भागुबाई पुढे सरसावली व चादरीतले पैसे व्यवस्थित गुंडाळून मदारीच्या खांद्यावर उडी मारली. मदारीने भागुबाईला प्रेमाने कुरवाळत गाठोडे उचलले व नवा खेळ दाखवण्यास पुढील चौकात निघाला. उन्हाळ्याची सुट्टी छान गेली म्हणून बच्चे कंपनी खुश व नवे काहीतरी बघायला मिळाले म्हणून पब्लिकदेखील खुशीत आपापल्या घराकडे निघाले.

– धनंजय

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)