मदनदादा करणार भाजपला जवळ?

कवठे – खंडाळा सहकारी साखर कारखान्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन करून व या कार्यक्रमास भाजपचे वजनदार मंत्री आणून मदन भोसले यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळाच स्फोट घडविला आहे. या कार्यक्रमात स्वत: मुख्यमंत्र्यांनी मदन भोसले यांना भाजप प्रवेशाच्या पायघड्या अंथरल्या असल्या तरी मुख्यमंत्री बोलत असताना नमस्कार करण्यापलिकडे कोणत्याही प्रकारचे सूचक वक्तव्य मदनदादांनी न केल्याने त्यांची भूमिका अजून तरी गुलदस्त्यातच आहे.

यावेळी स्वत: मुख्यमंत्री व सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाषराव देशमुख यांनी उपस्थित जनसमुदायास मदन भोसले भाजपात आले तर तुम्हाला चालेल काय? असा प्रश्न विचारल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने होकार दर्शविला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दादा आपण जनतेचा कौल घेवून चालता आणि जनतेने कौल दिला आहे असे सूचक वक्तव्य केले होते. जिल्हा कॉंग्रेसच्या वरच्या फळीतील राजकारणात नेहमीच मदनदादा सक्रीय सामील असताना जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्षपद रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाल्यानंतर सातारा येथे झालेल्या कॉंग्रेसच्या भव्य जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळ्याकडे व लोणंद येथे झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा या दोन्ही कार्यक्रमाला मदनदादांची अनुपस्थितीसुद्धा बरच काही सांगून जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रविवारी वेळे व सोळशी दरम्यान असलेल्या एका कारखाना संचालकाच्या फार्म हाऊसवर मदन भोसले यांनी स्वतः आपल्या वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील तसेच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीचा हेतू हा कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणे हा असल्याने या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दादांनी स्वत: मौन बाळगून दिली. यामध्ये दादा आपण घ्याल त्या निर्णयासोबत आम्ही आहोत, असा जरी कार्यकर्त्यांनी सूर आळवला तसेच दादा आता भाजपात प्रवेश कराच! असा आग्रहसुद्धा बऱ्याच कार्यकर्त्यांचा असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर जाणवले.

कार्यक्रम संपतो न संपतो तोच सोशल मीडियावर मात्र मदन भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मेसेज सुटू लागले असून येत्या28 तारखेला नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मदनदादा भाजपात जाणार असल्याचा मेसेज तसेच मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भाजपाध्यक्ष अमितशहा हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्यावेळी मदनदादांचा भाजपाप्रवेश आहे, असे संदेश सोशल मीडियावर फिरत असून याबाबत मदनदादा मात्र मौन बाळगून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)