होर्डिंग दुर्घटना : मदतीचा शब्द देताना आयुक्‍तही गहिवरले

पुणे – “आजारपणामुळे कालच आई गेली…आज अपघातामुळे वडीलही गेले…त्या चिमुकल्या मुलांनी करायचे काय? वृद्ध आजीवर मुलांना सांभाळण्याची वेळ आली आहे,’ अशी व्यथा होर्डिंग अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शिवाजी परदेशी यांच्या नातेवाईकांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडे मांडली. त्यावेळी “घडलेली घटना दुर्देवी आहे. सर्वोतपरी मदत करण्यासाठी आम्ही स्वत: प्रयत्न करत आहोत. “त्या मुलांसाठी आम्ही…’ असे म्हणताच महापालिका आयुक्त सौरभ राव “निशब्द’ झाले आणि परदेशी कुटुंबाला मदत मिळवून देण्याची आश्‍वासन देताना त्यांना गहिवरून आले.

जुन्या बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस करण्यासाठी पुणे महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांनी ससून रूग्णालयाला भेट दिली. त्यावेळी अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्याकडून मृत व्यक्तींची माहिती घेत जखमींची विचारपूस केली. त्यावेळी परदेशी कुटुंबियांच्या नातेवाईकांनी आयुक्त आणि महापौर यांची भेट घेऊन आई-वडिलांपासून पोरक्‍या झालेल्या चिमुकल्यांची व्यथा मांडली. “साहेब कालच माझ्या बहिणीचे निधन झाले. आज तिच्या अस्थिंचे विसर्जन करून दाजी आणि त्यांचे कुटुंबीय घरी येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. होर्डिंग दुर्घटनेत माझे दाजीही गेले. त्यामुळे दोन्ही मुले पोरकी झाली. असे म्हणताच, आयुक्त आणि महापौरांनी नातेवाईकांना धीर देत, परदेशी कुटुंबियांचे दु:ख आम्ही जाणतो. त्या मुलांना राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी आम्ही स्वत: प्रयत्न करत आहोत’.

“साहेब, “रात गई, बात गई’ अशी शासनाची भूमिका असते. मदतीसाठी पुन्हा नातेवाईकांनाच हेलपाटे मारावे लागणार. त्यामुळे आत्ताच काय ते सांगा अन्यथा आम्ही परदेशी यांच्या बॉडीला हातही लावणार नाही, इथेच बसून राहू, जोपर्यंत तुम्ही तुमची भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत बॉडी उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यावेळी आयुक्तांनी नातेवाईकांना विश्‍वास देत “राज्य शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करत आहेत. त्यासाठी तुम्हाला हेलपाटे मारावे लागणार नाही. काही अडचण आल्यास महापौर किंवा आम्हाला भेटा’ असे सांगत, “त्या मुलांची आम्हालाही काळजी आहे, त्या मुलांसाठी आम्ही…’एवढ्यावर आयुक्त थांबले आणि निशब्द झाले. त्यांचे डोळे पाणावले आणि नातेवाईकांना “मी करतो’ असे म्हणत धीर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)