मतिमंद मुलांसाठी काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा

नगर – मतिमंद मुलांसाठी काम करताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आवश्‍यक आहे. वाचा उपचार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास या मुलांची प्रगती होऊ शकेल. मतिमंद मुलांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्‍नही गंभीर आहे. अशा बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये 53 टक्‍के बालके मतिमंद असतात. असे प्रकार जास्त प्रमाणात नातेसंबंधात होत असतात. बाललैंगिक अत्याचाराबाबत अपंगांच्या विशेष शाळांमधील संस्था प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्ष राहिले पाहिजे. मुलांना केंद्रस्थानी ठेवून काम केल्यास अडचणींवर मात करणे शक्‍य असल्याचे असे मत शासनाच्या चुनौती प्रतिपूर्ती प्रकल्पाचे राज्य समन्वय समिती सदस्य प्रमोद निगुडकर यांनी व्यक्‍त केले.

जि. प. समाजकल्याण विभाग व टाटा विज्ञान सामाजिक संस्था, मुंबई यांच्या संयुक्‍त विद्यमाने नगर जिल्हा परिषदेत चुनौती प्रतिपूर्ती प्रकल्प याबाबत एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना निगुडकर बोलत होते. यावेळी प्रकल्पाचे अधिकारी प्रवीण दामले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, ऍड. लक्ष्मण पोकळे, नाझिन बागवान, बबन म्हस्के, शुभांगी पावले, दिनकर नाठे, स्नेहा महाजन, चांगदेव खेमनर, सचिन तरोडे, सुनील डुबे, संजय साळवे, विजय बळीद, ज्ञानदेव जाधव, आदी उपस्थित होते.

समाजकल्याण अधिकारी उबाळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, चुनौती प्रतिपूर्ती प्रकल्पाद्वारे मतिमंद मुलांसाठी विशेष कार्य करावयाचे आहे. मतिमंद मुले व इतर सर्वसामान्य मुले यांना शिक्षित करण्यात मोठा फरक असतो. या कामी मानसोपचार तज्ज्ञ, वाचा उपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असते. या सर्वांनी समन्वयाने काम केल्यास चांगले बदल घडू शकतात. या कार्यशाळेतील मार्गदर्शन सर्वांना प्रोत्साहन देणारे ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

चुनौती रिफ्लेक्‍शन अधिकारी प्रवीण दामले यांनी चुनौती प्रकल्पाचा उद्देश विशद करून मतिमंद मुलांचे शिक्षण व पुनर्वसन याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत चांगदेव खेमनर यांनी केले. संजय साळवे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील अपंग शाळांमधील वाचा उपचार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)